Join us  

वृद्ध पित्याला छळणाऱ्या मुलास घर सोडण्याचे हायकोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 8:54 AM

उच्च न्यायालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आईच्या मृत्यूपश्चात तिच्या नावावर असलेला वरळी येथील एसआरए प्रकल्पातील फ्लॅट बळकावून वृद्ध पित्याला आणि अविवाहित बहिणींना छळणाऱ्या मुलगा व सून यांना उच्च न्यायालयाने फटकारले आहे. उच्च न्यायालयाच्या न्या. गौतम पटेल व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने मुलाला येत्या २० दिवसांत घर सोडण्याचे आदेश दिले आहेत. मुलाच्या छळाला कंटाळून पित्याने ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती.

२००४ मध्ये मुलाचा विवाह झाल्यानंतर तो अन्यत्र राहण्यास गेला. २०१० मध्ये वडिलांनी त्याला मुंब्रा येथे फ्लॅट आणि त्याच्या वाट्याचे दीड लाख रुपये दिले.

पुनर्विकासानंतर मुलाच्या आईला वरळीतील फ्लॅटचा ताबा मिळाला. जून २०१९ मध्ये आईचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलगा आणि त्याचे कुटुंब वरळीतील फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आले. त्यानंतर मुलगा, सून आणि त्यांची मुले यांनी मुलाचे वडील व दोन अविवाहित बहिणी यांना त्रास देण्यास सुुरुवात केली. त्याविरोधात वडिलांनी ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे दाद मागितली. न्यायाधिकरणाने वडिलांच्या बाजूने न्याय दिला. 

उच्च न्यायालय म्हणाले...

 वरळीतील फ्लॅट आईचा असल्याने त्याचे आपणही वारसदार आहोत, असे मुलाचे म्हणणे होते. 

 न्यायाधिकरणाने प्रतिवाद्यांच्या दाव्यांचा काळजीपूर्वक विचार केला आहे. सबब याचिकाकर्त्यांनी २० दिवसांत घर सोडावे.

 सून आणि नातवंडांवर कोणतेही आरोप नसले तरी सुनेने सासरच्यांविरोधात भलीमोठी तक्रार दाखल केली आहे. त्यावर नजर टाकल्यास हा संपूर्ण वाद फ्लॅटचा ताबा मिळविण्यासाठी असल्याचे लक्षात येते.

टॅग्स :उच्च न्यायालयमुंबई