मुंबई - जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने एचसीजी कॅन्सर सेंटर मुंबईतर्फे #BaldAndBold अभियानाचा भाग म्हणून स्ट्रँड्स ऑफ होप हे केशदान अभियान राबविले. एचसीजीने कोप वुइथ कॅन्सर एनजीओ व प्रख्यात हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब यांच्या भागीदारीने देशभरातील कर्करुग्णांना धीर दिला आणि सहानुभूती दर्शविली. एचसीजीमधील डॉक्टरांसोबतच सामान्य व्यक्ती मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी कर्करुग्णांना दिलासा देणे हे त्यांचे उद्दिष्ट होते आणि त्यांनी या चळवळीला पाठिंबा दर्शविला. या अभियानाच्या औचित्याने एचसीजी सेंटर कुलाबा आणि बोरिवली येथे सर्वसमावेशक ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. या स्पेशलाइझ्ड वैद्यकीय केंद्रात स्तनांच्या कर्करोगाचे निदान, उपचार, व्यवस्थापन यांच्याशी संबंधित विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्वतः कॅन्सर सर्व्हायव्हर असलेल्या लोकप्रिय चित्रपट व टीव्ही अभिनेत्री छावी मित्तल यांच्या हस्ते ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले.
या जनजागृती उपक्रमाच्या माध्यमातून, कर्करोगाशी लढा देणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एचसीजीने उचललेले हे पाऊल आहे. स्ट्रॅंड्स ऑफ होप आणि #BaldAndBold ही दोन्ही अभियाने या मध्यवर्ती कल्पनेशी सुसंगत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून टक्कल असण्याबाबत असलेले पूर्वग्रह खोडून काढण्यासाठी महिलांना सक्षम करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून कर्करुग्णांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान वाढविणे आणि त्यांच्यात कधीही हार न मानण्याची वृत्ती बाणविणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. दान केलेल्या केसांचा उपयोग करून कर्करुग्णांसाठी केसांचा टोप तयार करण्यात येईल.
हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्राइस लिमिटेडचे रिजनल बिझनेस हेड जॉर्ज ॲलेक्स म्हणाले, "कर्करोगांवरील उपचारांच्या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. कर्करोगावरील उपचारांदरम्यान होणाऱ्या केसगळतीमुळे कर्करुग्णांना धक्का बसतो. कारण केस हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी व आत्मसन्मानाशी संबंधित आहे. कर्करुग्णांना धीर देणे आणि त्यांच्या आत्मसन्माला चालना देणे हे एचसीजी केशदान अभियानाचे उद्दिष्ट आहे. स्तनांच्या कर्करोगाचे निदान लवकर झाले तर त्यामुळे जीव वाचतोच, त्याचप्रमाणे उपचारांचे अधिक चांगले परिणाम दिसून येतात. स्तनांच्या कर्करोगाचे वेळेत निदान करण्याबद्दल जागरुकता निर्माण करणे, हे या नव्याने लाँच करण्यात आलेल्या क्लिनिकचे उद्दिष्ट आहे."
ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिकमध्ये मॅमोग्राम चाचणी आणि अल्ट्रासाउंड व एमआरआयसारख्या इतर इमेजिंग चाचण्या करून घेता येऊ शकतात. या चाचणी पर्यायांचा उपयोग करून स्तनांच्या कर्करोगाचे किंवा स्तनांशी संबंधित इतर आजारांचे निदान करता येऊ शकते, बायोप्सी करून ऊतीचे नमुने घेता येतात, जनुकीय चाचणी करता येते आणि स्तनांच्या कर्करोगाची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल तर समुपदेशन करण्यात येते. नव्याने लाँच करण्यात आलेल्या ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिकमध्ये ब्रेस्ट सर्जन, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आणि प्लास्टिक सर्जन अशा स्पेशालिस्टचे कन्सल्टेशन घेता येऊ शकते.