महिलेला मारहाण करत मोबाइल हिसकावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:06 AM2021-02-25T04:06:52+5:302021-02-25T04:06:52+5:30
मुंबई : महिलेचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना विरोध केला, म्हणून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार कांदिवलीत घडला. या प्रकरणी ...
मुंबई : महिलेचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना विरोध केला, म्हणून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार कांदिवलीत घडला. या प्रकरणी मंगळवारी दोघांना समतानगर पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.
कांदिवलीच्या दत्तानीपार्कमध्ये १९ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. दुपारी साडेतीनच्या सुमारास सदर महिला या रस्त्यावरून चालत निघाल्या होता. त्याच वेळी एक स्कूटर त्यांच्या दिशेने आली. त्यात मागे बसलेल्या मुलाने त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने तो घट्ट धरून ठेवल्याने चोरासोबत तिची झटपट सुरू झाली. ती मोबाइल सोडत नाही, हे पाहून तो चोर गाडीवरून उतरला. त्यानंतर त्याने तिला जोरात ढकलले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत, नंतर तिचा मोबाइल खेचून स्कूटरवरून पसार झाला. या विरोधात महिलेने तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ.डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी २० ते २५ सीसीटीव्ही फुटेज पडताळत, स्थानिक खबऱ्याच्या मदतीने अल्पवयीन मुलाला पानाच्या टपरीवरून ताब्यात घेतले. चौकशीत बोरीवलीच्या राजेंद्रनगरमधून सोनू कुमार (१९) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.