जीन्स पँटमधून त्याने आणले तीन किलो सोने, एनसीबी मुंबईची नागपूर येथे कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 08:56 AM2023-05-10T08:56:45+5:302023-05-10T08:57:05+5:30
भारतीय नागरिकाला अटक
मुंबई/नागपूर : जीन्स पँटच्या आतील बाजूस छोटेखानी कापडी पिशव्यांमध्ये सोन्याची पेस्ट दडवत नागपूर विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाला नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) मुंबईच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या सोन्याचे वजन तब्बल ३ किलो ३५ ग्रॅम इतके असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी ८० लाख रुपये इतकी आहे.
प्रवाशाने पेस्ट स्वरूपातील सोने सात पॅकेटमध्ये जीन्स पॅन्टच्या आतील भागात स्टीच करून लपवून ठेवले होते. हा प्रवासी कतार एअरवेजच्या विमानाने ९ मे रोजी पहाटे २:३० वाजता दोहा येथून नागपुरात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी आणि तपासणी केली. त्याने सोने लपवून आणल्याची कबुली दिली. प्रवाशाने सोने कुणाकडून आणले, नागपुरात कुणाला
देणार होता, याची चौकशी करण्यात येत आहे. त्याने सीमाशुल्क १९६२ कायद्याचे उल्लंघन केले असून, त्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी जानेवारी महिन्यात विभागाने विमानतळावर पेस्ट स्वरूपात मुंबईहून आणलेले जवळपास १.६ किलो सोने एका प्रवाशाकडून जप्त केले होते.
दरम्यान, चार अधिकाऱ्यांची चमू प्रवाशाची चौकशी करीत आहे. ही कारवाई केंद्रीय सीमाशुल्क आयुक्त अभयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त पीयूष पाटील यांच्या नेतृत्वात सहायक आयुक्त/एआययू अविनाश पांडे आणि पाच अधिकाऱ्यांनी केली.