Join us

‘तो’ भीतीचा कॉल अन् तरुणी बेपत्ता; माहिम कॉजवेमधील थरारक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 3:20 AM

पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

मुंबई : ‘गर्दुल्ला पाठलाग करतोय. मला खूप भीती वाटतेय. तू फोन सुरूच ठेव,’ असे म्हणत २१ वर्षीय तरुणीने आईला कॉल केला. कॉल सुरू असतानाच तरुणी किंचाळली आणि तिचा मोबाइल बंद झाला. ती तरुणीही बेपत्ता झाल्याची घटना माहिम कॉजवेमध्ये घडली. माहिम पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तरुणीचा शोध सुरू केला आहे.माहिम पश्चिमेकडील परिसरात २१ वर्षीय नेहा (नावात बदल) कुटुंबासह राहते. तिने नुकतेचे वांद्रे येथील महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे केबिन क्रूचे प्रशिक्षण घेतले. त्यात तिची नोकरीसाठी निवड झाली आहे.बुधवारी रात्रीच्या सुमारास आई कामावरून सुटताच नेहाने तिच्यासोबत माहिम मार्केटमध्ये खरेदीस जाण्याचे ठरवले. त्यानुसार, आई काम करीत असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी रात्री साडेनऊच्या सुमारास तिने घर सोडले. त्यानंतर काही मिनिटांतच तिने आईला कॉल केला. घाबरलेल्या आवाजातच ती बोलत होती. त्यामुळे आईही घाबरली. एक नशेखोर पाठलाग करत असल्याचे तिने आईला सांगितले. तेथून ती पटकन निघूही शकत नाही. त्यामुळे तिने आईला फोन सुरूच ठेवायला सांगितले, जेणेकरून सुखरूप तुझ्यापर्यंत पोहचेन, असे सांगून ती आईशी बोलत होती. फोन सुरू असताना तिने जोरात किंचाळी फोडली आणि फोन कट झाला.