मुंबई - वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरला असताना, सरकारकडूनही अगोदरच्या सरकारला दोषी धरण्यात येत आहे. त्यामुळे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरेंनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन या प्रकल्पाची माहिती दिली. तसेच, सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याचेही ते म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील व्हिडिओचाही उल्लेख केला होता. आता, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तोच व्हिडिओ शेअर केला आहे.
राज्यात येऊ घातलेला जवळपास १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातून १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा (vedanta semiconductor) हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना लक्ष्य करत आहेत. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांनीच या प्रकल्पाची विधानसभेत माहिती दिल्याचे सांगितले.
जयंत पाटील यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये, ते विधानसभेत बोलताना दिसून येतात. विधानसभेत त्यांनी वेदांता प्रकल्पच्या गुंतवणुकीची माहिती दिली आहे. 'ते वेदांतावाला आला होता, जवळपास 4 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करतायत, अनेक उद्योजक येतायत,' असे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या व्हिडीओत सांगितलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे
आमच्याकडून वेदांता-फॉक्सकॉनसाठी सर्व ऑफर दिल्या होत्या. विरोधकांनी स्वत: आत्मपरिक्षण करावं. प्रत्येक प्रकल्प राज्यात यावा, अशी आमची भूमिका आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच राज्यात उद्योग वाढले पाहिजे. लोकांना रोजगार मिळायला हवे, तरुणांच्या हाताला काम मिळायला हवं, अशी आमची भूमिका असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. मोठा प्रकल्प राज्यात येण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे मदत करणार आहे. मागच्या सरकारमध्ये मी होतो. मात्र निर्णय दुसरे घेत होते, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी यावेळी लगावला. एकनाथ शिंदेंनी आज न्हावा शेवा प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.