Join us

धर्मवीर पाहून निघताना उद्धव ठाकरे मागे वळले; फडणवीसांच्या टीकेवर केवळ एकच वाक्य बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 11:02 PM

धर्मवीर पाहून आलेल्या उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा एका वाक्यात समाचार

मुंबई: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज धर्मवीर चित्रपटाचा विशेष शो पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अभिनेता प्रसाद ओकचं तोंडभरून कौतुक केलं. मी चित्रपट पाहतोय, असं एक क्षणही वाटलं नाही. इतकी जिवंत व्यक्तीरेखा प्रसाद यांनी साकारली आहे, असं ठाकरे म्हणाले.

दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या आनंद दिघेंची भूमिका प्रसाद ओक यांनी उत्तम साकारली आहे. आनंदजींच्या लकबी त्यांनी कशा आत्मसात केल्या माहीत नाही. पण मी चित्रपट पाहतोय असं मला वाटलंच नाही. प्रसाद ओक यांनी कमाल केलीय. त्यांचे मनापासून धन्यवाद, अशा शब्दांत ठाकरेंनी प्रसाद ओकचं कौतुक केलं.

फडणवीसांच्या टीकेवर उद्धव ठाकरे म्हणतात...चित्रपट पाहिल्यावर उद्धव ठाकरेंनी प्रसाद ओक यांचं कौतुक केलं. आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा दिला. गुरु-शिष्याचं नातं कसं असावं, त्यांचा एकमेकांवर किती विश्वास असावा, ते धर्मवीरमध्ये पाहायला मिळालं. आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे या गुरु-शिष्याचं नातं मी जवळून पाहिलं आहे, असं ठाकरे म्हणाले. प्रसारमाध्यमांशी बोलून उद्धव ठाकरे तिथून निघाले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं. त्यावर त्यांना गुरु शिष्याचं नातं सांगण्यात काही अर्थ नाही, असा टोला ठाकरेंनी लगावला.

फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकावाघांचे फोटो काढून कोणाला वाघ होता येत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. उद्धवजी, तुम्ही कधी संघर्ष केलात? कोणत्या आंदोलनात सहभागी झालात? कधी रस्त्यावर उतरलात?, अशी प्रश्नांची सरबत्ती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मी अयोध्येला गेलो. बाबरीचा ढाचा पाडला. मी अभिमानानं हे सांगतो. त्याबद्दल तुम्हाला मिरची लागण्याचं कारण काय, असा सवाल फडणवीसांनी गोरेगावातील हिंदी भाषिक मेळाव्यात बोलताना विचारला.

आम्ही अयोध्येला गेलो होतो. कारसेवक गेले होते. सहलीला चला, सहलीला चला म्हणून त्या कारसेवकांची थट्टा करू नका. देवेंद्र फडणवीस यांनी बाबरीच्या ढाच्यावर एक पाय जरी ठेवला असता, तरी बाबरी कोसळली असती, असं उद्धवजी म्हणतात. माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात. तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशा शब्दांत फडणवीस ठाकरेंवर बरसले.

मै तो अयोध्या जा रहा था.. बाबरी मस्जिद गिरा रहा था.. तुझ को मिर्ची लगी तो मै क्या करू, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना टोला हाणला. आम्ही बाबरी पाडली. आम्ही ते अभिमानानं सांगतो. त्यावेळी तुम्ही कुठे होतात, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. बाबरी पाडल्यावर आम्हाला बदायूच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तिथे आम्ही शिवसैनिकांची वाट पाहात होतो. पण कोणीच आलं नाही, असं फडणवीस म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसबाळासाहेब ठाकरे