- गौरीशंकर घाळे
मुंबई : मुंबई काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत वादाचे वारे वाहू लागले आहेत. पक्षाच्या १३७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाकडे ज्येष्ठ नेत्यांसह आमदार आणि बहुसंख्य नगरसेवक अनुपस्थित राहणार आहे. राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्क वरील सभेसाठीच्या कोर्टबाजीने मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी पक्षश्रेष्ठींची नाराजी ओढवून घेतली होती. त्यातच आता स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला बड्या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षातील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आले आहे.
काँग्रेसच्या १३७ व्या स्थापना दिनानिमित्त ऑगस्ट क्रांती मैदानाजवळील तेजपाल हॉल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच ठिकाणी काँग्रेसचा जन्म झाला होता. त्यामुळे येथील कार्यक्रमाला विशेष महत्व असते. यंदाच्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे मुंबई काँग्रेसतर्फे सांगण्यात आले होते.
आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे याकडे लक्ष लागले होते. मात्र, या कार्यक्रमाकडे ज्येष्ठ नेत्यांनी पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या अखेर दिवस आणि त्यात विधानसभा अध्यक्ष निवडीच्या घोळामुळे मंत्री आले नसल्याचा दावा भाई जगताप यांच्या निकटवर्तीयांनी केला. मात्र अंतर्गत वाद, शिवाजी पार्क प्रकरणामुळे बड्या नेत्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यक्रमापासून लांब राहणे पसंद केल्याचे सांगितले जात आहे.
बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक हजरदरवर्षी, मुंबईतील सर्व आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला असतात. मुंबईत काँग्रेसचे २९ नगरसेवक असूनही अगदी बोटावर मोजण्या इतकेच नगरसेवक मंगळवारच्या कार्यक्रमाला आले होते. शिवाय, माजी खासदार संजय निरुपम, प्रिया दत्त, मिलिंद देवरा अशा बड्या नेत्यांची गैरहजेरी तर आता नित्याची झाली आहे. सध्या मुंबई काँग्रेसमध्ये मनमानी सुरु असून त्यामुळेच अनेक नेत्यांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्षात येणे टाळल्याची मुंबईतील काँग्रेसच्या बड्या नेत्याने सांगितले.