Join us

शेवटी आईचंच काळीज! मुलाला वाचवण्यासाठी तिनं माकडाचे हल्ले झेलले; घरात अर्धा तास थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:06 AM

माकडाच्या हल्ल्यात महिला जखमी; कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उपचार

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई : ‘माकड सरसर माझ्या अंगावर चढले. त्यामुळे काय करावे मला समजलेच नाही. तरी मी स्तब्ध उभी राहिले आणि सतत त्याला गुंतवून ठेवत त्याचे हल्ले परतवून लावल्यावर नकोसा पाहुणा अखेर घरातून निघून गेला...’ मंगळवारी घरात शिरलेल्या माकडासोबत जवळपास अर्धा तास दोन हात करताना बोरिवली पूर्वच्या रजनी यांनी अनुभवलेला थरार ऐकताना कोणाच्याही अंगावर सहज काटा उभा राहील. त्यांच्यावर सध्या कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयाकडून उपचार सुरू आहेत.

रजनी रवींद्र टी (५५) असे या महिलेचे नाव असून त्या बोरिवलीच्या सुकरवाडीमध्ये विठ्ठल पटेल चाळीत मुलगा आणि पतीसोबत राहतात. त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, उकाडा असल्याने मंगळवारी मुलाने घराचा दरवाजा उघडा ठेवला. तेव्हा दरवाजाला लावलेल्या पडद्याच्या आडून एक माकड त्यांच्या घरात शिरले. त्यावेळी त्यांचे पती काही कामानिमित्त बाहेर गेल्याने त्या आणि मुलगा हे दोघेच घरी होते. माकड माझ्या मुलावर हल्ला करेल याची भीती माझ्या मनात होती. त्यामुळे मी मुलाला लगेचच माकडापासून दूर करत मागच्या बाजूला असलेल्या खोलीत बंद केले. ते पाहून चिडलेले माकड माझ्या दिशेने धावत आले आणि सरसर थेट अंगावरच चढले. त्यामुळे मी घाबरले. क्षणात काय करू हे काहीच सुचत नव्हते तरी मी तशीच स्तब्ध उभी राहिले. त्यानंतर मूठभर चण्याचे दाणे मी त्याच्या समोर टाकले. घरभर चणे पसरले जे पाहून ते खाली उतरले खरे. मात्र, माझ्या अगदी जवळच असल्याने हालचाल करण्याची संधी मला मिळत नव्हती.

मच्छरांपासून संरक्षणासाठी अंगावर लावण्याची क्रीमची ट्यूब त्याने हातात घेत ती पिळून खाण्यास सुरुवात केली. ती खाल्ल्यानंतर ते माझ्या दिशेने धावले आणि माझ्या हाताला त्याने कडकडून चावा घेत मला रक्तबंबाळ केले. त्यामुळे मी वेदनेने किंचाळले तेव्हा माझ्या आवाजाने माकड दरवाजाच्या बाहेर जाऊन घुटमळू लागले. भळाभळा रक्त वाहणाऱ्या जखमी हातानेच मी घराचा दरवाजा धाडकन बंद केला. मुलाला खोलीतून बाहेर काढले. तो मला मिठी मारून रडू लागला. माकड निघून गेल्याचे नक्की करतच मी घराबाहेर पडले आणि दवाखाना गाठला. ते माकड सुकरवाडीमध्ये अजूनही धुमाकूळ घालत असल्याने स्थानिकांमध्ये दहशत पसरली आहे.

...तर तुम्ही फटाके वाजवा !

वनविभागाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. माकड पकडण्याचा पिंजरा आकाराने मोठा असल्याने तो चाळीमध्ये लावणे शक्य नाही. ते एखाद्या घरात शिरले तर आम्हाला संपर्क करा. सदर घरात कोणी नसेल तर त्याला पकडणे सोपे येईल. अन्यथा तुम्ही फटाके वाजवा आणि त्याला पळवून लावा, असा सल्ला वनाधिकाऱ्यांनी स्थानिकांना दिला आहे.

फोटो ओळ : माकडाच्या हल्ल्यात जखमी रजनी आणि वनाधिकारी.