काय चाललंय ते बघून येतो, फोन केला अन् छगन भुजबळांनी पवारांना असा चकवा दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 10:58 AM2023-07-03T10:58:57+5:302023-07-03T11:00:46+5:30
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांचं बंड आणि राज्याच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलथापालथीला वर्ष होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच काल महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला.
एकनाथ शिंदे यांचं बंड आणि राज्याच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलथापालथीला वर्ष होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच काल महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. कुणालाही कुणकूण लागू न देता घडलेल्या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, अतिशय गोपनीय पद्धतीने घडवून आणण्यात आलेल्या या बंडाबाबतच्या काही सुरस कहाण्या आता समोर येत आहेत.
अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांमध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या निकटवर्तीयांचाही समावेश होता. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काही नेते राजभवनावर जाऊन मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची कुणकुण रविवारी सकाळी शरद पवार यांना लागली होती. त्यावेळी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना फोन केला. तसेच तिकडे काय चाललंय ते बघून येतो, असं सांगितलं. मात्र छगन भुजबळ हे राजभवनावर गेले आणि थेट मंत्रिपदाची शपथ घेऊनच बाहेर आले. त्यामुळे अनेकांना धक्का बसला.
राज्याच्या राजकारणात झालेली उलथापालथ आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा उल्लेख करत या प्रकाराबाबत माहिती दिली. राजभवनामध्ये शपथविधीची तयारी सुरू असताना मला छगन भुजबळ यांचा फोन आला. तिकडं काय चाललंय ते पाहून येतो, असं त्यांनी मला सांगितलं. मात्र नंतर छगन भुजबळ यांनीच मंत्रिपदाची शपथ घेतल्याचं मला कळलं, असे शरद पवार यांनी सांगितले.