- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई - बोरिवली पश्चिम परिसरात विजय कनोजिया (२७) हा तरुण जेवण झाल्यानंतर बाहेर चक्कर मारून येतो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र रस्त्यात निष्काळजीपणे पार्क केलेल्या टेम्पोला त्याची मोटरसायकल धडकून अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने कानोजिया कुटुंबीयांना जबर धक्का बसला असून टेम्पो चालकाविरोधात बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार अमित कनोजिया (२३) हा त्याचे आई,वडील आणि मोठा भाऊ विशाल याच्यासोबत बोरिवली पश्चिमच्या कस्तुरपार्क या ठिकाणी राहतो. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ६ ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास कनोजिया कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर मी जरा बाहेर चक्कर मारून येतो असे घरच्याना सांगत विशाल रात्री साडेबाराच्या सुमारास त्याची मोटरसायकल घेऊन बाहेर पडला. बराच वेळ विशाल घरी परतला नाही. मात्र रात्री दीडच्या सुमारास त्याचा मित्र वीरभद्रिया मतपती यांने अमितला फोन करत विशाल याचा कुलकर्णी मार्गावर अपघात झाल्याचे आणि त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केल्याचे कळवले. त्यानुसार कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली तेव्हा विशालवर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या अपघाताबाबत चौकशी केल्यानंतर कुलकर्णी मार्गावर एका टेम्पोला धडकून विशाल खाली पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या मेंदूचे ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा मीरा रोडच्या एका खाजगी रुग्णालयात मेंदूचे ऑपरेशन योग्य रीतीने होईल अशी माहिती मिळाल्याने विशालला ७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता सदर मिरा रोडच्या रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास विशालचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला.
कुलकर्णी मार्गावर पार्क करण्यात आलेल्या टेम्पोला रस्त्यावर सुरक्षात्मक बॅरिगेटिंग करण्यात आले नव्हते. तसेच सिग्नल लाईटही न लावता तो धोकादायकरीत्या रहदारीला अडथळा तसेच इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा रीतीने पार्क करण्यात आला होता. त्यानुसार तो पार्क करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.