पत्नीच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणीच अग्नी देण्याची
सुसाइड नोटमध्ये विनंती..
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्नीच्या विरहात मुलीची हत्या करून संपविले आयुष्य
पत्नीच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणीच अग्नी द्या; सुसाइड नोटमध्ये आईला विनंती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे पत्नीचे निधन झाले. त्यानंतर पत्नीच्या निधनामुळे तणावात असलेल्या पतीने, ‘पत्नीचे अंत्यसंस्कार ज्याठिकाणी केले त्याच ठिकाणी माझेही करा’, अशी सुसाइड नाेट लिहून, मुलीची हत्या केली व स्वतःचेही आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना विलेपार्ले परिसरात घडली. जितेंद्र भाडेकर (३६), असे मृत पतीचे नाव असून, सांताक्रुझ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
भाडेकर हे डायमंड कंपनीच्या बॅक ऑफिसमध्ये काम करीत होते. ते पत्नी, मुलगी, भाऊ आणि आईसोबत चारकोप भागात राहण्यास होते. गेल्या वर्षी जून महिन्यात गृहिणी असलेल्या त्यांच्या ३२ वर्षीय पत्नी माधवी यांचे कोरोनामुळे निधन झाले. पत्नीच्या निधनामुळे ते तणावात होते. घरच्यांनी डिसेंबर महिन्यात जबरदस्तीने त्यांचे दुसरे लग्न लावून दिले.
त्यांचा विलेपार्ले येथील डिसुजा अपार्टमेंटमध्ये वडिलांचा फ्लॅट आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी तेथे शिफ्ट व्हायचे ठरविले. रविवारी ते मुलीसोबत घरातील सामानाची व्यवस्था करण्यासाठी जातो, असे सांगून बाहेर पडले. बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांच्या भावाने त्यांना कॉल केला. मात्र, अनेकदा फाेन करूनही ते फाेन घेत नसल्यामुळे त्यांनी शेजारच्यांंना याबाबत चौकशी करण्यास सांगितले. मात्र, त्यांचा दरवाजा बंद असून, आतून कोणीही प्रतिसाद देत नसल्यामुळे शेजाऱ्यांनी सांगितले. अखेर दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.
* माझ्यानंतर मुलगीही जगू शकत नाही!
पोलिसांना घटनास्थळावरून त्यांनी आईसाठी लिहिलेली सुसाइड नोट सापडली. यात ‘जगण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र जगणे शक्य होत नाही. माझ्यानंतर मुलगीही जगू शकत नाही. मला माफ करा. पत्नीचे अंत्यसंस्कार ज्याठिकाणी केले त्याच ठिकाणी माझेही करा’, अशी विनंती त्यांनी केली हाेती. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. त्यांच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीत पत्नीच्या मृत्यूमुळे ते तणावात होते. मात्र, नियमित कामाला जायचे. त्यांच्या वागण्यातून ते टोकाचे पाऊल उचलतील असे वाटले नव्हते. सांताक्रूझ पोलिसांनी भाडेकर यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला असून, ते अधिक तपास करीत आहेत.
...
यूट्यूबवरून आत्महत्येचे सर्चिंग..
पोलिसांनी त्यांचा मोबाइल तपासला असता त्यात यूट्यूबवरून आत्महत्येबाबत सर्चिंग करीत असल्याचे दिसून आले.
...