Join us  

मनावर दगड ठेवून मुख्यमंत्रिपद दिले, टीका हाेताच भाजपने व्हिडीओ हटविले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 8:02 AM

उद्घाटनपर भाषणात पाटील म्हणाले की, शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : भाजपने आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केले. या निर्णयाने आम्हाला दु:ख झाले, पण गाडा नीट हाकायचा असेल तर आनंदाने पुढे जावे लागते, असे ते म्हणाले.

उद्घाटनपर भाषणात पाटील म्हणाले की, शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला, पण आम्हाला दु:ख झाले. अक्षरश: मनावर दगड ठेवून सर्वांनी आणि विशेषत: फडणवीस यांनी निर्णय मान्य केला. काहीजण तर रडले, पण ते दु:ख पचवून सर्व आनंदाने पुढे गेलो. कारण आपल्याला पुढे जायचे आहे. हिंदुत्व संपविण्याचे काम आधीच्या सरकारमध्ये होत होते. रा. स्व. संघावर, मोहनजी भागवत यांच्यावर एकेरीत टीका होत होती. तेव्हा आपण परिवर्तन घडवून आणले. महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचे धोरण ठेवले, पण आपला कार्यकर्ता डगमगला नाही. 

टीका हाेऊ लागताच भाजपने व्हिडीओ हटविलेपाटील यांच्या या विधानावर टीका होताच भाजपने पाटील यांच्या भाषणाचे व्हिडिओ समाजमाध्यमांतून हटविले. विधानाचा माध्यमांनी गैरअर्थ काढला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी स्पष्ट केले. शिंदे हेच आमचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात सरकार दमदार कामगिरी करेल, असे ते म्हणाले.

काॅंग्रेसचा चिमटा : पाटील यांच्या विधानावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत, ‘मै खुश हू मेरे आसुओं पे न जाना’ असा चिमटा काढला.

आमदारकीसाठी आग्रह धरू नकाराज्यपाल नियुक्त बारा आमदारांसाठी बाराशे जणांचे बायोडाटा आले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारातही जागा नाहीत, त्यागाची तयारी ठेवा, असा सबुरीचा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.    

 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसचंद्रकांत पाटीलभाजपामुख्यमंत्री