मुंबई - मुंबईतील जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकक रेल्वेमध्ये गर्दी ही नित्याचीच. या गर्दीने तुडुंब भरणाऱ्या लोकलमध्ये धक्काबुक्की, भांडणेही रोजच होत असतात. बऱ्याचदा अशी भांडणं ही तेवढ्यापुरती असतात. मात्र सध्या लोकलमधील भांडणाचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भरधाव वेगात जात असलेल्या लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये कडाक्याचं भांडण होऊन त्यातील एकजण दुसऱ्या प्रवाशाला धक्का देऊन बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.
मुंबई मॅटर्स नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यात दोन व्यक्ती लोकलच्या दरवाजाजवळ उभे असल्याचे दिसत आहेत. त्यांच्यामध्ये कुठल्या तरी कारणावरून वादावादी होऊन भांडण सुरू होते. त्यानंतर त्यांच्यामधील एकजण दुसऱ्याच्या गळ्याला पकडून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतो. तर ती व्यक्ती ग्रिलला पकडून कशीबसी स्वत:ला वाचवते. दरम्यान, इतर प्रवासी हा प्रकार पाहून आरडाओरडा करताना दिसत आहेत. त्यानंतर या दोघांमध्ये पुन्हा एकदा वादावादी होते.
हा व्हिडीओ पाहून या घटनेदरम्यान, थोडी जरी गडबड झाली असती तरी एखाद्याचा मृत्यू झाला असता. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे समजत नाही. मात्र तो पाहून आता लोक यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहीजण हे आता रोजचंच झालंय असं म्हणत आहेत. तर किरकोळ गोष्टीवरून एकमेकांचे जीव घेणार का, असा सवाल विचारत आहेत.