ठाणे : भरधाव दुचाकीवरील चोरट्यांनी तिची सोनसाखळी खेचली. मात्र, तिनेही तेवढ्याच धैर्याने चोरट्याचा टी-शर्ट पकडल्यानंतर त्याने गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. यात रक्तबंबाळ अवस्थेत ती फरफटत गेली. पण, त्याचा टी-शर्ट सोडला नाही. अखेर, जमावाने त्याला पकडलेच. या घटनेत जखमी झालेल्या आणि आलेल्या प्रसंगावर मोठ्या धैर्याने मात करणाऱ्या नंदा शेटे (४९) यांची प्रकृती आता स्थिरावली असून या आरोपीला जामीन मिळू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्याला जामीन मिळाला तर तो पुन्हा अशा प्रकारचे कृत्य करण्यास मोकाट सुटेल. त्यामुळेच अशा सोनसाखळी चोरांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ज्या वेळेस ही घटना घडली, त्या वेळेस ठाणे ग्रामीणच्या त्या तीन पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचेही त्यांनी कौतुक केले.कळवा, खारीगाव येथे राहणाऱ्या नंदा दिलीप शेटे या शनिवारी आपल्या नातवाला सिनेमा दाखविण्यासाठी गणेश टॉकीज येथे तिकिटे काढण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, तिकिटे न मिळाल्यामुळे त्या चालत सिव्हील रुग्णालयाच्या दिशेने पुन्हा घरी परतत होत्या. याच वेळेस दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. मात्र, वेळीच प्रसंगावधान राखून त्यांनी दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याचा टी-शर्ट पकडला. मात्र, या चोरट्यांनीही त्याच अवस्थेत गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ २० ते २२ फूट खेचल्यानंतर आणि रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेतही त्यांनी त्याचा टी-शर्ट सोडला नाही. पुढे दुचाकी कलंडली आणि तेवढ्यात तेथील जमावाने तेथे धाव घेतली. परंतु, एक जण यात फरार झाला असून शफी अख्तर जाफरी याला जमावाने चांगलाच चोप दिला. परंतु, त्याच वेळेस त्या ठिकाणी ठाणे ग्रामीणचे तीन पोलीस आले आणि त्यांनी योग्य प्रकारे सहकार्य केले. परंतु, पोलिसांनी दोन साक्षीदारांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले असता त्यातील एकानेही पुढाकार घेतला नाही. अखेर, त्याच अवस्थेत त्यांनी उद्या तुमच्या आई, बहिणीवर असा प्रसंग ओढवला असता तर तुम्ही असेच केले असते का, असा सवाल उपस्थित करताच तब्बल आठ साक्षीदार पुढे सरसावले. परंतु, आता जोपर्यंत अटक आरोपीला शिक्षा होत नाही, तोपर्यंत माझ्या जीवाची तळमळ थांबणार नाही. पुन्हा असे प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक धोरण अवलंबले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)
सोनसाखळी चोराला पकडून त्यांनी घडविला आदर्श
By admin | Published: July 01, 2015 11:30 PM