Join us  

त्याने इयर पॉडमध्ये लपवले होते दीड कोटींचे सोने; मुंबई विमानतळावर पकडले, सीमा शुल्क विभागाची कारवाई

By मनोज गडनीस | Published: March 18, 2024 3:38 PM

यापैकी पहिल्या प्रकरणात अदिस अबाबा येथून आलेल्या एका परदेशी प्रवाशाकडून ९८७ ग्रॅम सोने त्याच्या हँडबॅगेमधून जप्त करण्यात आले.

मुंबई - मोबाईल फोनसाठी वापरण्यात येणाऱ्या हँडस् फ्री इयर पॉडमध्ये २१६ ग्रॅम सोने लपवत त्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका प्रवाशाला मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या सोन्याची तस्करी विमानतळावर पकडली गेली आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावर पाच प्रकरणांत मिळून एकूण २ किलो ६६ ग्रॅम सोने पकडण्यात आले असून याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दीड कोटी रुपये इतकी आहे. तर, याचसोबत मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब्लेट संगणक देखील जप्त करण्यात आले आहे. 

यापैकी पहिल्या प्रकरणात अदिस अबाबा येथून आलेल्या एका परदेशी प्रवाशाकडून ९८७ ग्रॅम सोने त्याच्या हँडबॅगेमधून जप्त करण्यात आले. दुसऱ्या प्रकरणात सिंगापूर येथून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून कपड्यांत लपविलेले ८२० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याने हे सोने त्याच्या परिधान केलेल्या अंतर्वस्त्रात लपवले होते. तिसऱ्या प्रकरणात दुबई येथून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून ४०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. चौथ्या प्रकरणात दुबईतून आलेल्या दोन भारतीय प्रवाशांकडून २४२ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. 

यामध्ये सोन्याच्या दागिन्यांचा देखील समावेश होता. तर, पाचव्या प्रकरणात रियाध येथून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाकडून २१६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याने हे सोने मोबाईलसाठी वापरल्या जाणाऱ्या इयर पॉडमध्ये लपविल्याचे आढळून आले. दरम्यान, १० मार्च ते १६ मार्च या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावर आतापर्यंत एकूण पाच कोटी ५३ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीसोनंविमानतळ