डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची शंभर फुटांनी वाढविणार; राज्य सरकारने काढला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 12:50 AM2020-09-11T00:50:06+5:302020-09-11T06:34:45+5:30
स्मारकाची उभारणी मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) केली जात आहे.
मुंबई : दादरमधील इंदू मिलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या स्मारकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढविण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. पुतळ्याची उंची आता ४५० फूट इतकी असेल. राज्य शासनाने गुरुवारी याबाबतचा आदेश काढला.
या पुतळ्याचा चौथरा (पादपीठ) ३० मीटर म्हणजे १०० फूट उंच असेल आणि पुतळ्याची उंची १०६.६८ मीटर म्हणजे ३५० फूट इतकी असेल. आधी ही उंची २५० फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने चौथºयाची उंची कायम ठेवत प्रत्यक्ष पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढविण्याचे ठरविले आहे. चौथºयासह पुतळ्याची एकूण उंची ४५० फूट इतकी असेल.
या स्मारकाची उभारणी मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) केली जात आहे. या स्मारकासाठी ७६३ कोटी रुपयांच्या खर्चास प्राधिकरणाच्या १२ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. ७ जुलै २०२० रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत १ हजार ८९ कोटी ९५ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली. स्मारकाच्या उभारणीचे काम सध्या सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन ११ आॅक्टोबर २०१५ रोजी करण्यात आले होते. तेव्हापासून जवळपास तीन वर्षे स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नव्हते.