Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून त्याने तिला मारली मिठी, वाचा पुढे काय झाले ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 06:34 IST

मालाडच्या महाविद्यालयातील प्रकार

मुंबई : एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करत, तिला मिठी मारल्याचा प्रकार मालाड परिसरात सोमवारी उघडकीस आला आहे. होकार मिळविण्यासाठी तो तिला काही दिवसांपासून धमकावत होता. तरुणीने त्याच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी अमीर खान (२२) याला अटक केली आहे.

मालाडच्या एका नामांकित महाविद्यालयात तरुणी शिकते. गेल्या काही दिवसापासून खान तिचा पाठलाग करत होता. ती महाविद्यालयात जाताना तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. त्यात तिचा मोबाइल क्रमांक मिळवून तिला कॉल करून त्रास देणे सुरू केले. तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. सोमवारी सकाळी १० वाजता ती महाविद्यालयातून बाहेर पडली असता, तिला अडवून ‘फोन का घेत नाही,’ याबाबत विचारले, तसेच कॉल घेतला नाही, तर महाविद्यालयात येऊ देणार नाही, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर, तिला जवळ ओढून कानाखाली लगावली आणि सर्वांसमोर तिला मिठी मारली. तिने कसबसे त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि थेट मालाड पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी पोलिसांनी खानविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

टॅग्स :मुंबईदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टगुन्हा