लोकसभा निवडणूक लढण्यास सज्ज, विक्रमी मतांनी विजयी होणार; गजानन कीर्तिकर यांची स्पष्टोक्ती
By मनोहर कुंभेजकर | Published: November 5, 2023 05:57 PM2023-11-05T17:57:46+5:302023-11-05T17:58:32+5:30
माझे वय झाले तरी आजही मी भक्कम व तंदुरुस्त असून माझे शरीर व डोके स्ट्रॉंग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई-आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक मी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून लढण्यास सज्ज असून यंदा तर आपण साडेतीन लाख विक्रमी मतांनी निवडून येणार असंल्याचा ठाम विश्वास शिंदे गटाचे शिवसेना खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी लोकमतकडे व्यक्त केला. माझे वय झाले तरी आजही मी भक्कम व तंदुरुस्त असून माझे शरीर व डोके स्ट्रॉंग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेली सुमारे साडेनऊ वर्षे मी मतदार संघात झोकून देत विकासकामे केली आहे.मी ठामपणे सांगू शकतो की,माझी स्वतःची व्होट बँक असून माझा मतदार संघाशी आणि नागरिकांशी थेट संपर्क आहे. रोज मी 150 ते 200 नागरिकांना भेटतो.2024च्या लोकसभा निवडणुकीची मी कधीच तयारी सुरू केली असून यंदा तर आपण साडेतीन लाख विक्रमी मतांनी निवडून येणार असंल्याचा ठाम दावा त्यांनी व्यक्त केला.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आपला दावा सांगितला आहे. खासदार गजानन कीर्तीकर यांचं आता वय झालं आहे, जर ते निवडणुकीला उभे राहणार नसतील तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हे सिद्धेश कदम असतील असं महत्त्वपूर्ण वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दापोलीत केले होते. त्या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिद्धेश कदम यांची चर्चा झाली असेल अशीही शक्यता त्यांनी वर्तवली होती.रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर खासदार कीर्तिकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
अजून पक्षाच्या बैठकीत कोणाला तिकीट द्यायचे ते अजून ठरलेले नाही असे त्यांनी सांगितले.
आपले वय झाले या वक्तव्यावर भाष्य करतांना कीर्तिकर म्हणाले की,आज 96 वर्षांचे समाजवादी पार्टीचे खासदार लोकसभेत असून 70 ते 75 वयोगटातील 84 खासदार लोकसभेत आहे,मग वयाचा प्रश्न येतो कुठे असा सवाल त्यांनी केला.
ठाकरे गटातून आपले चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदार सांघातून उमेदवारी जाहिर झाली यावर भाष्य करतांना खासदार कीर्तिकर म्हणाले की,मी येथून निवडणूक लढवणार असल्याने तू माझ्या विरोधात निवडणूक लढवायची नाही, प्रचार करायचा नाही,तू हा मतदार संघ सोडून महाराष्ट्रात इतर कुठेही निवडणूक लढव,तिकडे मी प्रचार करणार नाही,माझ्याकडे तू प्रचार करू नकोस असे
त्याला आपण सांगितल्याचे खासदार कीर्तिकर यांनी लोकमतला सांगितले.
2009 साली दिवंगत खासदार गुरुदास कामत यांच्या विरोधात कीर्तिकर हे 30000 मतांनी पराभूत झाले होते.त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कामत यांचा सुमारे 175000 मतांनी पराभव केला होता.तर 2019च्या निवडणुकीत माजी खासदार संजय निरुपम यांचा
275000 मतांनी पराभव केला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत दि,11 नोव्हेंबर 2022 रोजी प्रवेश केल्यावर पक्षाची ध्येय धोरणे,विविध उपक्रम राबवत संघटना मजबूत केली.मतदारांच्या मागणी नुसार खासदार निधीतून सुमारे 100 कोटींची विकास कामे केली.
रामदास कदम यांच्या वक्तव्यावर भूमिका स्पष्ट करतांना खासदार कीर्तिकर म्हणाले की,एक भाऊ योगेश कदम हे दापोलोचे शिंदे गटाचे आमदार आहे, दुसऱ्या भावाला खासदार म्हणून एकाच घरात परत दोन तिकिटे कसे देणार असा सवाल करत मी त्याला विरोध करणार.मला जर पक्षाला तिकीट घ्यायचे नसेल तर दुसऱ्या एखाद्या चांगल्या व्यक्तीला तिकीट द्या असे त्यांनी स्पष्ट केले.पक्षात 13 खासदार आणि 40 आमदार असून तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगू शकत नाही.त्यांनी एजन्सी मार्फत लोकसभा मतदार संघाचा सर्व्हे केला असून त्यांनी आपल्या कामाची माहिती घ्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले.