Join us

तो 'माय का लाल' समाधान आवताडे, पडळकरांचा अजित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 8:37 AM

निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर, आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली. 

ठळक मुद्देतीन पक्ष एकत्र आल्यास कोण माय का लाल निवडून येत नाही, असे अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरुन, पडळकर यांनी समाधान आवताडेंचं नान घेत अजित पवारांना टार्गेट केलं. 

मुंबई - पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराने विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केलंय. त्यातच, आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन देत, बोचरी टीका केली. तीन पक्ष एकत्र आल्यास कोण माय का लाल निवडून येत नाही, असे अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरुन, पडळकर यांनी समाधान आवताडेंचं नान घेत अजित पवारांना टार्गेट केलं. 

चार पक्षातील तीन पक्ष एकत्र आले तर कोण माय का लाल निवडून येणार नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी पोटनिवडणुकीदरम्यान केलं होतं. आमदार फुटण्याची चर्चा रंगल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी (Ajit Pawar on Rebel) नारायण राणेंना हे प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, येथील निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर, आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली. 

पंढरपूर विधानसभेचा निकाल अत्यंत महत्त्वाचा असून महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार निकाल आहे. आम्ही 50 ते 80 हजार फरकांच्या मताने निवडून येणार आहोत, अशी स्टेटमेंट राष्ट्रवादीच्या नेत्यांची निवडणुकांपूर्वी होती. तीन पक्ष एकत्र आले तर कोण माय का लाल निवडून येत नसतो, असे अजित पवार म्हणाले होते. पण, तो माय का लाल म्हणजे समाधान आवताडे असल्याचं 15-20 दिवसांत महाराष्ट्राला दिसलं. भारत नाना भालके हे लोकांमध्ये राहणारे नेतृत्व होते, पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्यासारखा लोकांमध्ये मिसळणारा दुसरा नेता नव्हता. याशिवाय त्यांच्या निधनाने सहानुभूतीही भगिरथ भालकेंसोबत होती. तरीही, लोकांनी समाधान आवताडेंना स्विकारलं, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.  

काय म्हणाले होते अजित पवार

“निवडणूक झाली झाली त्या दिवसाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात जमीन-आस्मानचा फरक आहे, हे कोणी नाकारुच शकत नाही. सर्व आमदार आपापल्या पक्षासोबतच राहतील. कोणी काही करणार नाही. आम्ही एक ठरवलेलं आहे. जर एखाद्या पक्षातील एखाद्या आमदाराने कुठल्या दबावाखाली वेगळी राजकीय भूमिका घेतली, तर तिथे निवडणूक लागली. जर ए, बी, सी हे तीन पक्ष असतील. ‘ए’चा आमदार फुटला, तर ‘ए’ पक्ष जो उमेदवार देईल, त्याला ‘बी’ आणि ‘सी’ पाठिंबा देतील. चार पक्षातील तीन पक्ष एकत्र आले, तर कोण माय का लाल निवडून येणार नाही.” असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं होतं. 

टॅग्स :अजित पवारपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021गोपीचंद पडळकरसोलापूर