Join us

'वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही...'; देवेंद्र फडणवीसांनी मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 9:16 AM

Manohar Joshi Shivsena: मनोहर जोशी यांच्या निधनानंतर राज्यातील अनेक नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहे.

Manohar Joshi Shivsena: शिवसेनेचे पहिले आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. आज (२३ फेब्रुवारी) पहाटे ३.०२ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. 

मनोहर जोशी यांच्या निधनानंतर राज्यातील अनेक नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता. नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मनोहर जोशींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रेला सुरुवात होईल. दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती आहे.

मनोहर जोशींची कारकीर्द

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. १९९५ या वर्षी ते युतीच्या सत्तेत राज्याचे मुख्यमंत्री होते. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केलं आहे. आजारपणामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय नव्हते. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते होते. ते बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय होते.

टॅग्स :मनोहर जोशीउद्धव ठाकरेमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस