मुंबई : मुलीचा लग्न सोहळा उरकून दाम्पत्य घरी परतले. मात्र, चोरांपासून लपवून ठेवलेले दागिन्यांची बॅग रिक्षातच विसरल्याचा प्रकार दहिसर परिसरात समोर आला. दागिन्यांबाबत समजताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. एमीएचबी कॉलनी पोलिसांनी अवघ्या तासाभरात रिक्षा चालकाचा शोध घेत दाम्पत्याकडे ८ लाखांच्या दागिन्यांची बॅग सुखरूप ताब्यात दिली आहे.
दहिसर परिसरात राहणारे भारत भूषण आरटे (७०) हे पत्नीसह मुलीचा लग्न सोहळा उरकून गुरुवारी वैशाली नगर ते दहिसर असा रिक्षाने प्रवास करत घरी आले. चोरीच्या भीतीने अंगावरील सगळे दागिने त्यांनी बॅगेत काढून ठेवले होते. घरी आल्यानंतर दागिन्यांची बॅग रिक्षातच विसरल्याचे लक्षात येताच त्यांना बसला. त्यांनी तात्काळ म.एच.बी काॅलनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारींचे गंभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि सुर्यकांत पवार, पोउनि भारत पौळ, पोलीस हवालदार खोत व पोलीस शिपाई योगेश मोरे यांनी तपास सुरु केला. सीसीटीव्हीच्या मदतीने रिक्षाचा क्रमांक मिळवला. पुढे, बोरिवली ते दहिसर चेक नका परिसरात सीसीटीव्हीच्या मदतीने रिक्षाचा शोध घेत चालकाला ताब्यात घेतले.
रिक्षामध्ये राहिलेली तक्रारदार यांची बॅग सुखरूप त्यांच्या ताब्यात दिली. हरवलेले दागिने पुन्हा हातात मिळाल्याने वृद्ध दाम्पत्याने सुटकेचा निश्वास टाकला.