Join us

त्याने बॉम्ब-डेल म्हटलं तिने बॉम्ब है ऐकलं! मुंबई विमानतळावरुन प्रवाशाची रवानगी थेट तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2018 2:30 PM

काहीवेळा बोलताना आपण पूर्ण शब्द उच्चारण्याऐवजी शॉर्टफॉर्मचा वापर करतो. ज्यावेळी समोरच्याला या शॉर्टफॉर्मचा अर्थ लागत नाही तेव्हा त्यातून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते.

ठळक मुद्देवैतागलेल्या मुरजानी यांनी दुपारी अडीजवाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कंट्रोल रुमला फोन केला.ऑपरेटरने वरिष्ठांना या फोनकॉलबद्दल सांगितल्यानंतर वेगाने सूत्रे हलली. 

मुंबई - काहीवेळा बोलताना आपण पूर्ण शब्द उच्चारण्याऐवजी शॉर्टफॉर्मचा वापर करतो. ज्यावेळी समोरच्याला या शॉर्टफॉर्मचा अर्थ लागत नाही तेव्हा त्यातून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. विमान प्रवासात तर 'बॉम्ब-डेल' सारखे शॉर्टफॉर्म टाळलेच पाहिजेत. मुंबईहून-दिल्लीला जाणा-या एका प्रवाशाला या शब्दाचा अत्यंत वाईट अनुभव आला. मुंबई-दिल्ली विमानाच्या स्टेटसची चौकशी करताना विनोद मूरजानी (45) यांनी 'बॉम्ब-डेल' शब्द वापरला. त्यातून गैरसमज निर्माण झाल्यामुळे विनोद मूरजानी यांना अटक झाली होती. 

विनोद मूरजानी हे अमेरिकेतील एका आयटी कंपनीचे सीईओ आहेत. ते मुंबईहून दिल्लीला विमानाने जाणार होते. दिल्लीवरुन एअर इंडियाच्या विमानाने ते रोमला जाणार होते. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही होते. रविवारी खराब हवामानामुळे विमान उड्डाणाला विलंब झाला. त्यामुळे वैतागलेल्या मुरजानी यांनी दुपारी अडीजवाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कंट्रोल रुमला फोन केला. त्यांनी फोनवरुन समोरच्या ऑपेरटरकडे बॉम-डेल स्टेटसची विचारणा केली. 

त्यांना मुंबई-दिल्ली विमानाच्या स्टेटसबद्दल माहिती हवी होती. पण त्यांनी बॉम-डेल असा शॉर्टफॉर्म केला. समोरच्या ऑपरेटरने तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? असा प्रतिप्रश्न केला. त्याला कोणताही प्रतिसाद न देता मुरजानी यांनी फोन कट केला. ऑपरेटरच्या सांगण्यानुसार तिने बॉम्ब है असे ऐकले आणि समोरच्याने फोन कट केला. ऑपरेटरने वरिष्ठांना या फोनकॉलबद्दल सांगितल्यानंतर वेगाने सूत्रे हलली. 

दोन तासानंतर साडेचार वाजता विनोद मूरजानी, त्यांची पत्नी आणि मुलांना दिल्लीला जाणा-या विमानातून उतरवण्यात आले व  त्यांना अटक केली. मूरजानी यांनी विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवली असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.  मुरजानी यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामिन मंजूर केला. माझ्या अशीलाला 'बॉम्ब-डेल' म्हणजे मुंबई-दिल्ली  म्हणायचे होते, कुठलीही दहशत पसरवायची नव्हती असे आरोपींच्या वकिलाने सांगितले. विनोद मुरजानी मित्रांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. ते दिल्लीहून रोममार्गे अमेरिकेला जाणार होते.  

टॅग्स :विमानतळ