मुंबई - जगभरात प्रादुर्भाव झालेल्या कोरोना व्हायरसने बहुतांश देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चीनमधून प्रसार झालेल्या कोरोनाचा विषाणू आता भारतातील बहुतांश रा३१ज्यात पसरला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये, गर्दीची ठिकाणे, चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जवळपास वैद्यकीय आणीबाणी लागू झाल्याने सर्वकाही बंद दिसत आहे. मात्र, वैद्यकीय क्षेत्र जोमाने कामाला लागले आहे. रुग्णालयातील नर्सपासून ते आरोग्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण दिवसरात्र झटताना दिसत आहेत. या डॉक्टर्स आणि स्टाफच्या कार्याचं नागरिकांकडून कौतुक होतंय. माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्या सर्वांचे कौतुक केलंय.
कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करणे आवश्यक आहे. गर्दीवर नियंत्रण मिळाल्यासच ते शक्य होईल. यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दी कमी करण्याच्या हेतुने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेत. रुग्णालयातील नर्स, डॉक्टर्संपासून ते आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्रीही जोमाने कामाला लागले आहेत. सर्वांना कामाच्या ठिकाणी सुट्ट्या देण्यात आल्या आहेत, पण वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. तरीही, कोरोनाचे संकट हे देशाचे संकट मानून प्रत्येकजण दिवसरात्र झटताना दिसत आहे. त्यामुळे, सर्वच स्तरातून वैद्यकीय क्षेत्राला सलाम ठोकण्यात येत आहे. तर मेडीकल आर्मी, कोरोना फायटर्सं असे म्हणत वैद्यक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक होतंय.
पंकजा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करत, सातत्याने काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनाच कडक सॅल्यूट ठोकला आहे. आमच्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या तुम्हाला सॅल्यूट असे पंकजा यांनी म्हटलंय. दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात एका सामान्य नागरिकाकडून आलेला मेसेज शेअर करत हे वाक्य अतिशय छान असल्याचंही पंकजा यांनी म्हटलं. मी तुमच्यासाठी रुग्णालयात काम करतोय, तुम्ही ''आपल्यासाठी'' घरी बसा, असा भावनिक संदेश प्रसार भारतीच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. पंकजा यांनी हा मेसेज शेअर करत वैद्यकीय क्षेत्राच्या कामाचं कौतुक केलंय.