Join us

फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मुंबईकराला घातला 2 कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 11:56 AM

तपास केला असता या टोळीने मुंबईतील वेगवेगळ्या बँकांमध्ये 108 बोगस खाती उघडली असल्याचं समोर आलं आहे

ठळक मुद्दे वांद्रे येथील एका ज्येष्ठ नागरिकाला नायजेरियन टोळीने घातला 1.97 कोटींचा गंडा या टोळीने मुंबईतील वेगवेगळ्या बँकांमध्ये 108 बोगस खाती उघडली असल्याचं समोर आलं आहेटोळीच्या म्होरक्याला मिरा रोडमधील नयानगरमधून अटक करण्यात आली असून, सर्व खाती सील करण्यात आली आहेत

मुंबई, दि. 14 - वांद्रे येथील एका ज्येष्ठ नागरिकाला नायजेरियन टोळीने 1.97 कोटींचा गंडा घातल्याचं समोर आलं असून सायबर पोलीस तपास करत आहेत. तपास केला असता या टोळीने मुंबईतील वेगवेगळ्या बँकांमध्ये 108 बोगस खाती उघडली असल्याचं समोर आलं आहे. यासाठी खोट्या पॅन कार्डचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत हे रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. टोळीच्या म्होरक्याला मिरा रोडमधील नयानगरमधून अटक करण्यात आली असून, सर्व खाती सील करण्यात आली आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील 72 वर्षीय व्यक्तीला त्यांच्या फेसबूकवरील मित्राने अफगाणिस्तानमधील एका स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास खूप मोठा फायदा होईल असं अमिष दिलं होतं. पोलिसांनी तपास सुरु केला असता, त्याची पाळंमुळं दिल्लीत असल्याचं समोर आलं. पीडित व्यक्तीने पैसे ट्रान्सफर केलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिल्लीला जाऊन मंगल बिष्णोई, अमित अग्रवाल, समीर मर्चंट उर्फ करण शर्मा, जितेंद्र राठोड आणि परेश यांना अटक केली. जे पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते, ते सर्व आरोपींना आधीच काढून घेतले होते. 

चौकशी केली असता, या टोळीची मुंबई आणि दिल्लीत अनेक बँक खाती असल्याचं उघड झालं. 'तपास सुरु असताना आम्ही केवायसी कागदपत्रांची छाननी केली असता, अनेक खाती पॅन कार्डच्या आधारे उघडली असल्याचं समोर आलं. जेव्हा आम्ही पॅन कार्डची तपासणी केली तेव्ही ती सर्व बोगस असल्याचं लक्षात आलं. तपास सुरु असताना आम्ही मिरा रोडमधील मोमम्मद आरीफ शेखकडे पोहोचलो. त्याला अटक केली असता त्याच्याकडे बोगस कागदपत्रं, तसंच 11 पॅन कार्ड सापडले. बोगस पॅन कार्ड बनवण्यात तो खूप हुशार आहे. त्याने आतापर्यंत किती पॅन कार्ड बनवले आहेत, आणि कोणा कोणाला मदत केली आहे याची माहिती घेत आहोत', अशी माहिती पोलीस अधिका-याने दिली आहे. 

पॅन कार्डचा वापर करत वेगवेगळ्या बँकांमध्ये एकूण 108 खाती उघडण्यात आली होती. ही सर्व खाती पोलिसांनी सील केली आहेत. या बँक खात्यांमध्ये एकूण एक कोटी रुपये जमा होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी सर्व पैसे ट्रान्सफर केले आहेत, जिथून ते काढून घेण्यात आले आहेत. या सर्वामागे नायजेरियन मास्टरमाइंड असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.