त्याने चिरला एअर होस्टेसचा गळा; अंधेरीतील घटनेत खुन्याला अटक, CCTVमुळे ओळख पटली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 06:26 AM2023-09-05T06:26:49+5:302023-09-05T06:27:28+5:30
रुपल ओग्रे छत्तीसगडची असून, एप्रिलमध्ये एअर इंडियाच्या एअर होस्टेस प्रशिक्षणासाठी मुंबईत आली होती.
मुंबई : अंधेरी-मरोळ परिसरातील फ्लॅटमध्ये रविवारी रात्री २४ वर्षीय रुपल ओग्रे या ट्रेनी एअर होस्टेसचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी सफाई काम करणारा विक्रम अटवाल (४०) याला अटक केली आहे.
रुपल ओग्रे छत्तीसगडची असून, एप्रिलमध्ये एअर इंडियाच्या एअर होस्टेस प्रशिक्षणासाठी मुंबईत आली होती. तिची बहीण व बहिणीचा मित्र यांच्यासोबत मरोळ येथील एनजी कॉम्प्लेक्समध्ये ती राहत होती. ते दोघे आठ दिवसांपूर्वी गावी निघून गेल्याने रुपल एकटीच होती. रुपलने रविवारी सकाळी कुटुंबीयांशी व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलवर गप्पाही मारल्या. मात्र, त्यानंतर बराच वेळ फोन न घेतल्याने तिच्या कुटुंबीयांनी मुंबईतील मित्र परिवाराशी संपर्क साधून रुपलची चौकशी करण्यास सांगितले. मात्र, बेल वाजवूनही दार न उघडल्याने अखेर त्यांनी पवई पोलिसांशी संपर्क साधला.
डुप्लिकेट चावीने फ्लॅटचा दरवाजा उघडला तेव्हा रुपल रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिला राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तिच्या कुटुंबीयांना कळविले आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच तिचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अधिक माहिती मिळू शकेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपी अटवाल याला ओग्रे राहत असलेल्या सोसायटीत एका खासगी कंपनीकडून नियुक्त करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. तसेच परिमंडळ १०चे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ८ तपास पथकांची नियुक्ती करण्यात आली, त्यातील एका टीमने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या पत्नीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
हत्येचा उद्देश लवकरच समोर
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे, त्यानुसार हत्येच्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शींची चौकशीही आम्ही करत आहोत. आरोपीचा जबाब, तांत्रिक आणि वैद्यकीय पुरावे यांच्या मदतीने गुन्ह्यामागचा मूळ उद्देश काय आहे, हे लवकरच समोर येईल.
- दत्ता नलावडे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १०
ओग्रेचा मित्र तिला भेटायला वरचेवर यायचा. अटवालने हे पाहिले होते. त्याची तिच्यावर वाईट नजर होती. रविवारी ओग्रेने अटवालला बाथरूमचा चोकअप झालेला पाईप साफ करायला बोलावले. ही संधी साधत अटवाल घरी गेला आणि त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यावर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यात अटवालने ओग्रेवर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी त्याठिकाणी असलेल्या चारही सफाई कामगारांना चौकशीसाठी बोलावले त्यावेळी आरोपीच्या अंगावर नखांच्या खुणा दिसल्या. नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.