Join us

मांडूळ खरेदीसाठी त्याने विकले घर, रिक्षाचालकाची अंधश्रद्धा, राज्यात ‘मांडूळ गँग’ सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 1:37 AM

दुतोंड्या म्हणून ओळख असलेल्या मांडुळामुळे गुप्तधन सापडते, पैशांचा पाऊस पडतो, बाजारात याची विक्री केल्यास दुप्पट पैसा मिळतो या अंधश्रद्धेतून चेंबूरच्या रिक्षाचालकाने लखपती होण्याचे स्वप्न रंगविले. घर विकून पाच लाख रुपयांत मांडूळ खरेदी केला.

मुंबई : दुतोंड्या म्हणून ओळख असलेल्या मांडुळामुळे गुप्तधन सापडते, पैशांचा पाऊस पडतो, बाजारात याची विक्री केल्यास दुप्पट पैसा मिळतो या अंधश्रद्धेतून चेंबूरच्या रिक्षाचालकाने लखपती होण्याचे स्वप्न रंगविले. घर विकून पाच लाख रुपयांत मांडूळ खरेदी केला. त्यानंतर तो दहा लाखांना विकण्यासाठी ग्राहकही शोधला. मात्र त्याच दिवशी मुंबई गुन्हे शाखेच्या तावडीत तो सापडल्याची घटना मंगळवारी घडली. युसूफ हैदरअली शहा (५०) असे या रिक्षाचालकाचे नाव असून, त्याच्याकडून ४ फूट ९ इंचाचा मांडूळ जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुंबईसह राज्यभरात मांडूळ गँग सक्रिय झाल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे.मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असलेला शहा चेंबूरच्या वत्सलाताई नगर परिसरात कुटुंबीयांसह राहातो. दीड वर्षापूर्वी त्याला एका व्यक्तीने मांडुळाबाबत सांगितले. मांडूळ घरात ठेवल्याने आणि पूजा केल्याने आर्थिक वृद्धी होते. पैशांचा पाऊस पडतो. बाजारात या मांडुळासाठी बडे उद्योजक, व्यावसायिक १० ते १५ लाख रुपये मोजतात, असे त्याला समजले. त्यानंतर त्याने घर विकून नंदुरबार येथून पाच लाखांना मांडूळ खरेदी केला.दीड महिना ग्राहकाच्या शोधात तो मांडूळ घेऊन भाड्याच्या घरात राहू लागला. याच दरम्यान त्याला १० लाखांचे गिºहाईक सापडले. त्याची वाट बघत तो भायखळा जिजामाता उद्यान परिसरात मांडूळ घेऊन उभा राहिला. मात्र, याबाबत मालमत्ता कक्षाला समजले. त्यानुसार मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक दीप बने, सुनील माने, लक्ष्मीकांत साळुंखे, पोलीस अंमलदार यांनी जिजामाता उद्यान परिसराकडे धाव घेतली. शहाच्या संशयास्पद हालचाली पाहून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत पिशवीतील ४ फूट ९ इंचाचा मांडूळ पथकाने हस्तगत केला. त्याने तो कोणाकडून विकत घेतला, तो कोणाला विकणार होता, आदींचा तपास पथक शोध घेत आहे.या घटनेवरून तसेच यापूर्वी केलेल्या काही कारवायांवरून राज्यात मांडूळ गँग सक्रिय झाल्याचा संशय असून, अधिक तपास सुरू असल्याचे मालमत्ता कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक दीप बने यांनी सांगितले.तिसरी कारवाईमालमत्ता कक्षाने वर्षभरात केलेली ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वीही त्यांनी दोन तस्करांकडून मांडूळ जप्त केले होते.

टॅग्स :मुंबई