Join us

लग्न टिकून राहण्यासाठी हेमासोबत पुन्हा राहिलो

By admin | Published: December 15, 2015 4:21 AM

आमचे लग्न टिकून राहावे यासाठी आमच्या मित्रांनी खूप प्रयत्न केल्यामुळे मी हेमासोबत आमच्या जुहु येथील निवासस्थानी ८ डिसेंबरपर्यंत राहिलो, अशी माहिती चिंतन उपाध्यायने

- डिप्पी वांकाणी,  मुंबई

आमचे लग्न टिकून राहावे यासाठी आमच्या मित्रांनी खूप प्रयत्न केल्यामुळे मी हेमासोबत आमच्या जुहु येथील निवासस्थानी ८ डिसेंबरपर्यंत राहिलो, अशी माहिती चिंतन उपाध्यायने पोलिसांना दिली. चिंतनची पत्नी हेमाचा मृतदेह सापडल्यानंतर चिंतन उपाध्यायची गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही कसून चौकशी केली.गुन्हे शाखेतील अंतर्गत सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार चिंतन त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल सांगताना अनेकवेळा खूप रडला व त्याने तिच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. आम्ही चिंतनला अजूनही ‘क्लिन चिट’ दिलेली नाही व ज्यांनी कट रचला त्यांच्या अटकेची वाट बघत आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.‘‘चिंतन हा शांत स्वभावाचा तर त्याची पत्नी हेमा तापट डोक्याची होती, असे त्याचे अनेक मित्र येऊन आम्हाला सांगत आहेत. चिंतन व हेमा हे २०१० पासून घटस्फोटाच्या प्रक्रियेमध्ये असले तरी घटस्फोट न घेण्याचा आणखी एकदा विचार करा असा सल्ला त्यांच्या मित्रांनी त्यांना दिला होता. ठरले असे होते की या दोघांनी एकमेकांसोबत राहायचे व घटस्फोटाच्या कटकटीच्या मुद्यांवर न बोलता इतर सामान्य विषयांवर चर्चा करावी. चिंतनने आम्हाला हा उपाय लागू होत होता’’, असे सांगितले, असे गुन्हा शाखेच्या सूत्रांनी सांगितले.अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हेमाने जी पोटगी मागितली होती त्याबद्दल चिंतनची काही तक्रार नव्हती. त्याने आम्हाला सांगितले की त्याने हेमाने मागितलेले १६.५ लाख रुपये न्यायालयाकडे आधीच जमा केले असून पोटगीबद्दल न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत तिच्या खर्चासाठी दरमहा ४० हजार रुपये देत होतो.’’ हा अधिकारी म्हणाला की, ‘‘हेमा बेपत्ता असल्याचे चिंतनला त्याचे मित्र आणि मोलकरणीकडून समजल्यावर त्याने स्वत:हूनच मुंबईला यायचे ठरविले. आम्ही जेव्हा त्याला आमच्याकडे बोलावले त्यावेळी त्याने मी विमानाने निघत असल्याचे सांगितले. तो येथे येताच तो आम्हाला भेटला.’’ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हेमासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल सांगताना चिंतन अनेकवेळा खूप रडला. पत्नीच्या निधनामुळे तो खूप दु:खी असल्याचे दिसते. त्याला तिच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहायचे होते त्यामुळे आम्ही त्याला स्मशानभूमीत नेले, असे हा अधिकारी म्हणाला.अद्याप क्लीन चिट दिलेली नाहीगुन्ह्यामध्ये चिंतनच्या सहभागाचा जेवढा संबंध आहे तेवढ्यावरून त्याला क्लिन चिट देण्यात आली आहे का असे विचारता हा अधिकारी म्हणाला की,‘‘सध्या तरी त्याचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा आम्हाला दिसला नाही. तरीही आम्ही त्याला क्लिन चिट दिलेली नाही. या खूनात ज्यांचा सहभाग आहे त्यांना अटक होईपर्यंत चिंतनची विचारपूस केली जाईल.’’ गुन्हे शाखेने चिंतनचे कॉल डाटा रेकॉर्ड तपासले असून त्याने खूनांपूर्वी हेमा व भांबानी किंवा अन्य संशयितांशी संपर्क साधलेला नाही.