Join us

मालकाच्या भोजनात गुंगीचं औषध मिसळून २.५ कोटींचे हिरे चोरले, बिहारला पळाले, एका चुकीने पकडले गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 10:08 AM

Mumbai Crime News: मुंबईमधील आपल्या मालकाच्या घरातून सुमारे अडीच कोटींची दागदागिने घेऊन पळालेल्या दोन नोकरांना बिहारमधून अटक करण्यात आली आहे. या दोघांनीही मालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना गुंगीचं औषध पाजून ही चोरी केली.

मुंबईमधील आपल्या मालकाच्या घरातून सुमारे अडीच कोटींची दागदागिने घेऊन पळालेल्या दोन नोकरांना बिहारमधून अटक करण्यात आली आहे. या दोघांनीही मालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना गुंगीचं औषध पाजून ही चोरी केली. या घटनेला आठवडा उलटल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना बिहारमधून पकडले. या चोरट्यांना पकडण्यामध्ये आधारकार्डची पोलिसांना खूप मदत झाली.

पोलिसांनी पकडलेल्या चोरट्यांकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींची ओळख नीरज उर्फ राजा यादव (१९) आणि राजू उर्फ शत्रुघ्न कुमार (१९) अशी पटवण्यात आळी आहे. दोघांवरही कथितपणे १० फेब्रुवारी रोजी मुंबईतील खार परिसरात असलेल्या त्यांच्या मालक आणि कुटुंबीयांच्या भोजनामध्ये  गुंगीचं औषध मिसळलं, त्यानंतर घरातील मौल्यवान सामान घेऊन ते फरार झाले.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना ११ फेब्रुवारी रोजी ५५ वर्षीय तक्रारदार मालकाला त्याच्या फ्लॅटमधील हिऱ्यांचे दागिने गायब असल्याचे दिसून आल्यावर उघडकीस आली. दरम्यान, झोपेतून जागे झाल्यानंतर उलट्या करू लागल्याने माझ्या कुटुंबीयांना या घटनेनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे तक्रारदार मालकाने सांगितले. तसेच चोरीसह इतर कलमांखाली नोकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर पोलिसांनी मागच्या सोमवारी राजा यादव आणि शत्रुघ्न कुमार यांना त्यांच्या आधार कार्डवरील नोंदी आणि तांत्रिक मदतीने पकडले. या दोघांनाही बिहारमधून पकडण्यात आले. दोघांनाही भादंवि कलम ३२८, ३८१ आणि कलम ३४ अन्वये अटक करण्यात आले.  

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईबिहार