मुंबई : गिरगाव चौपाटीवर मलनिस्सारणासाठी लावण्यात आलेल्या पाईपवर पालिका प्रशासनाने वरच्या बाजूस कट्टा तयार केला आहे. या कट्ट्यावर चौपाटीवर पर्यटनासाठी येणारे नागरिक बिनधास्तपणे समुद्राच्या दिशेस पाय बाहेर काढून तासनतास बसतात; मात्र समुद्राने रौद्ररूप धारण केल्यास हाच कट्टा क्षणार्धात जीवघेणा ठरू शकतो, याची कल्पना पर्यटकांना नाहीय, पालिकेने येथे कोणतेही सुरक्षा कुंपण घातलेले नाही. त्यामुळे आता पर्यटकांच्या जीवाचा विचार कोण करणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.
या चौपाटी परिसरात अगदी काॅलेजवयीन तरुण-तरुणींपासून ते अगदी लहानग्यांना घेऊन कुटुंबही बिनधास्तपणे भटकंती करताना दिसतात. या आवारातील पर्यटकांची वागणूक पाहून प्रशासनाने त्वरित येथे सुरक्षा भिंत किंवा कुंपण घातले पाहिजे. समुद्रात भरती असल्यास या कट्ट्यावरील पर्यटकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो.
मुंबईतील गिरगाव चौपाटीवर कायमच स्थानिकांसह अनेक पर्यटकांची लगबग दिसून येते. मागील काही वर्षांपासून या ठिकाणी रात्री बारा वाजल्यापासून ते पहाटे पाचपर्यंत पर्यटकांच्या फिरण्यावर बंदी घातली आहे. येथे येणारे पर्यटक थेट समुद्रात जाऊन पोहण्याचा, पाण्यात मनसोक्त बागडण्याचा आनंद घेताना दिसतात; मात्र सुरक्षितेचे काय?
दोन पाळ्यांमध्ये लाईफ गार्डस् तैनात या ठिकाणी ही चौपाटी डीबी मार्ग आणि गावदेवी पोलिसांच्या हद्दीत येते. त्यांच्या चमूमध्ये हवालदार, बीट मार्शल आणि दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. या चमूकडून दिवसातून दोन वेळेस व्हॅनमधून गस्त घालण्यात येते. चौपाटीवर अग्निशमन दलाकडून कंत्राट पद्धतीवर दोन पाळ्यांमध्ये १२ लाईफ गार्डस् तैनात आहेत. या लाईफ गार्डस्ना बसण्यासाठी कक्षाची सोय केली असून त्यांच्या किटसह संपूर्ण चौपाटीवर लक्ष ठेवून असतात. वर्षांतून दोनवेळा या लाईफ गार्डस्ना नियमित प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी शहर उपनगरातील सर्व चौपाट्यांवरील लाईफ गार्डस्ना गिरगाव चौपाटीवर प्रशिक्षण दिले जाते. यात शारीरिक व मानसिक फिटनेसवर भर दिला जातो, अशी माहिती लाईफ गार्ड कपिल तांडेल यांनी दिली आहे.