लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चोर असल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार गुरुवारी बोरिवलीत घडला. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी इमारतीच्या सुरक्षारक्षकासह पाच जणांना अटक केली आहे. प्रवीण लहाने असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा भाऊ पोलिस आहे.
प्रवीणचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, त्यातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. चोर असल्याच्या संशयावरून त्याला बोरिवली येथील सोसायटीमधील सुरक्षारक्षकांसह इतरांनी मारहाण केली. लाथाबुक्क्यांसह लाठी, हॉकी स्टिक आणि बॅटने मारहाण करण्यात आली. त्यानंतर नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शताब्दीमध्ये त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. मात्र, त्याला पुन्हा आकडी आल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी भादंवि कलम ३०४ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तरुणाने मृत्यूपूर्वी मद्यप्राशन केले होते का, याबाबतचा वैद्यकीय अहवाल प्रलंबित असल्याचे पोलिस म्हणाले.
गावी स्थायिक झाला होतासचिन नाना काळे उर्फ प्रवीण लहाने हा एका पोलिस अधिकाऱ्याचा भाऊ असून ते सांताक्रुझ पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. प्रवीणचा व्यवसाय होता. मात्र, कोरोनाकाळात त्याने व्यवसाय बंद करत गावी स्थायिक झाला. तेथून तो अधूनमधून मुंबईत येत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.