मुंबई - घरातून बाहेर न पडणारे मुख्यमंत्री अशी टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. मी कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित चालवतो. माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत. पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचे आता अनेक अर्थ काढले जात आहेत. मात्र, हे विधान त्यांच्या मित्र पक्षांसाठीच असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर, यावरुन खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर शाब्दीक प्रहार केले आहेत.
उद्धव ठाकरेंनी लाचारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं, आज टीपू सुलतानची जयंती साजरी करतायंत. आम्ही होतो ती शिवसेना वेगळी होती, ही शिवसेना वेगळी आहे. मुख्यमंत्री म्हणून सरकारी यंत्रणा हाताळण्याचं काम त्यांच्याकडे नाही, त्यांना ना खड्डे माहितीय, ना तिजोरी माहितीय. गाडी कशी चालवायची माहिती असेल, पण सरकार कसं चालवायचं याचा अभ्यास नाही, असे म्हणत राणेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय. तसेच, शरद पवार आहेत म्हणून मी शब्द वापरत नाहीत. हे सरकार म्हणजे शरद पवार सोडून ही सगळी नौटंकी आहे, असे म्हणत शरद पवार यांच्याविरोधात बोलणं नारायण राणेंनी टाळलं. मात्र, नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांवर शाब्दीक प्रहार केले.
उद्धव ठाकरेंचा मंत्र्यांवर अंकुश नाही, सरकारमधील शिवसेना केवळ कलेक्टरसारखे फिरतेय, कलेक्शनसाठी. दुसरीकडे, सरकारकडे पैसे नाहीत, म्हणून जिल्हा नियोजनसाठी जिथं 142 कोटी रुपये मिळायचे तिथं यंदा केवळ 42 कोटी मिळाले. त्यातही, 50 टक्के कोरोनासाठी. म्हणजे, 21 कोटी रुपयांत सगळा कारभार करायचा, हे यांच सरकार. म्हणे हातात स्टेअरिंग आहे, कशाचं स्टेअरिंग. खरं म्हणजे चुकलंय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी यायचं की, कुठल्यातरी कंपनीत ड्रायव्हर म्हणून जायचं? हे चुकून इकडं आलेत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या स्टेअरिंगवरील वक्तव्यावरुन नारायण राणेंनी जहरी टीका केलीय.
कार चालवण सोपं असतं, पण सरकार...
कारचे स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे, हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगायची गरज नाही. ते सगळं सत्तेत सोबत बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ते सांगत असतील. जनतेला माहीत आहे कोणाच्या हातात काय आहे, असे फडणवीस यांनी म्हटलंय. ''स्टेअरिंग माझ्याकडे आहे, हे आम्हाला सांगून काय फायदा?, ते जे सांगत आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला. कोणाच्या हातात स्टेअरिंग आहे, कोणाकडे ब्रेक आहे, कोणाकडे एक्सिलेटर आहे, हे जगाला माहितीय. कोण कधी ब्रेक लावतं, कोण एक्सिलेटर वाढवतं. खरं म्हणजे मुख्यमंत्री म्हणाले माझ्या हातात कार आणि सरकार दोन्ही आहे. मुख्यमंत्र्यांनी कार चालवणं सोपं असतं. कारण, मुख्यमंत्री आल्यानंतर ट्रॅफिक थांबलेलं असतं. पण, इथं समस्यांचा ट्रॅफिक सुरु असतं. त्यावेळी, कोणी मित्र ब्रेक लावतात, कोणी एक्सीलेटर वाढवतात, मग कुणी आपल्याच हातात स्टेअरिंग असल्याची घोषणा करतं,'' असे म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्टेअरिंग विधानावर पलटवार केलाय.