मुंबई - रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांना एका हॉटेलचालकाने भररस्त्यात अडवून उधारी देण्याची मागणी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खोत यांच्यावर टिका करण्यात येत आहे. त्यावर, सदाभाऊंनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे. आाता, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि सदाभाऊ यांचे जुने सहकारी राजू शेट्टी यांनी संबंधित हॉटेलवाल्याबद्दल माहिती दिली आहे. हॉटेलचालक शिनगारे हे स्वाभिमानीचे कार्यकर्ते होते, असे त्यांनी म्हटलंय.
राष्ट्रवादीला सांगतो बदमाश गुन्हेगाराला माझ्या अंगावर घालून कुभांड रचून आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न करत असाल तर हे यशस्वी होणार नाही. निश्चितपणे रयत क्रांती संघटना याचा मुकाबला करेल, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. राज्यात २१, २२ जूनला राज्यव्यापी कार्यकारिणीची बैठक बोलविली आहे. संघर्ष अटळ आहे, जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले. तसेच, राष्ट्रवादीच्या लाल टोमॅटोसारखे गाल असलेला नेता म्हणत खोत यांनी सांगोल्यातील नेत्यांवर टिका केली होती. त्यानंतर, संबंधित हॉटेलवाला हा राष्ट्रवादीचा समर्थक आणि त्यांची सोडलेला असल्याचंही ते म्हणाले. आता, याबाबत राजू शेट्टींनी पोलखोल केली आहे.
सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मागणारा हॉटेल मालक अशोक शिनगारे हा कार्यकर्ता पूर्वी आमच्या संघटनेत सक्रिय होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्याने आम्हाला साथ दिल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे, राजू शेट्टींनी एकप्रकारे या घटनेची पोलखोलची केली आहे. त्यामुळे, आता राजू शेट्टींच्या खुलाशावर सदाभाऊ खोत काय उत्तर देतील, याकडे सर्वांचे लक्षलागले आहे.
काय म्हणाले होते सदाभाऊ खोत
सांगोल्यात घडलेल्या घटनेमागे लाल टॉमेटो सारखे गाल असलेला नेता कोण आहे, त्याचे नाव वेळ आली की सांगेन. आजपासून त्याचे बगलबच्चे बोलायला लागतील, त्यावरून तो कोण हे समजेल. अजून काही लोक त्याठिकाणी होते. या लोकांना मी ओळखतो. वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला चावत नाही, तो ज्याने दगड मारलाय त्याचा घोट घेतो, कुत्रा दगड मारणाऱ्याला चावतो. माझ्या जिवाला पवार कुटुंबापासून धोका आहे. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा गंभीर आरोप खोत यांनी केला होता.