Join us

जी घटनादुरुस्ती नार्वेकरांनी नाकारली, त्या ठरावाला आयडेंटीटी घालून त्यांचीच उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 7:46 PM

विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात, तर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात याचिका करण्यात आली आहे

मुंबई - आमदार अपात्रता प्रकरण निकालानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून सर्वोच्च न्यायालयात पुन्ह दाद मागितली आहे. दुसरीकडे आजपासून आपण जनतेच्या न्यायालयात जात असल्याचे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत दोन विधितज्ज्ञांनाही बोलावण्यात आलं होतं, ज्यांनी शिवसेनेची व कायद्याची बाजू समजावून सांगितली. यावेळी शिवसेनेकडून २०१३ सालच्या शिवसेनेच्या घटनादुरुस्तीच्या कार्यक्रमाचा व्हिडिओही दाखवला. त्यामध्ये, विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही दिसून येत आहेत.  

विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात, तर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात याचिका करण्यात आली आहे. त्यातच, आज उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या दरबारात न्याय मिळेल, असे म्हणत सर्वांसमोर या केससी संबंधित काही पुरावे सादर केले, यात निकालाचे विश्लेषणही करण्यात आले. सुरुवातील ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी पक्षांतर बंदी कायद्याची माहिती दिली. यानंतर शिवसेना आमदार अनिल परब यांनी २३ जानेवारी २०१३ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णय सांगितले, आणि या बैठकीतील व्हिडीओ स्वरुपात पुरावे दाखवले. या व्हिडिओ राहुल नार्वेकर हेही दिसत आहेत. 

आमदार अनिल परब यांनी २०१३ च्या बैठकीचे व्हिडीओ दाखवले. यात शिवसेनेतील सर्वाधिकार पक्षप्रमुख यांना दिल्याचा ठराव केल्याचे सांगितले. या बैठकीचा त्यांनी व्हिडीओ दाखवला आणि यातील ठरावही दाखवले. या बैठकीत शिवसेनेतील दिग्गज नेते उपस्थित असल्याचे दिसत आहे. याच बैठकीत पक्षाध्यक्षांकडे असणारे अधिकार पक्षप्रमुख यांच्याकडे सोपावण्यात आल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी मांडल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओ राहुल नार्वेकर हेही गळ्यात भगवं आयडेंटीटी कार्ड अडकवून शिवसैनिक हजर असल्याचं दिसत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ दाखवून  आमदार अनिल परब यांनी पुरावा दिला आहे. 

राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने मला १९९१ चे संविधान पाठिवले आणि मी त्यांना विचारणा केली की काही सुधारणा असतील तर पाठवा. त्यांनी सांगितले की या निर्णयात याबाबत लिहिलेले आहे. २०१८ ची घटना दुरूस्ती आमच्याकडे नाही, असे निवडणुक आयोगांने सांगितले. ते सांगतात की आम्ही संविधान दुरूस्ती सबमिट केली ते कागद दाखवतात. त्यांनी जे पत्र निवडणूक आयोगाला दिले त्यात घटना दुरूस्तीबद्दल काहीच लिहिलेले नाही. तर, निवडणुकीबद्दल लिहिलेले आहे. ही निवड बिनविरोध झाली. आम्ही इथे निवडणुकीचा निकाल जोडत आहोत, अस स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिलं. तसेच, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असून हे दसरा मेळाव्याचं भाषण वाटल्याचा टोलाही नार्वेकर यांनी लगावला.  

टॅग्स :शिवसेनाराहुल नार्वेकरअनिल परबभाजपाउद्धव ठाकरे