Join us

दारूसाठी पैसे न दिल्याने घरी जाऊन गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 2:56 PM

याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग  हॅरी ऊर्फ हरिसेन ॲन्थोनी जोसेफ याच्यासह त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

मुंबई : दारू पिण्यासाठी दोनशे रुपये दिले नाहीत म्हणून  एका माथेफिरू बॅग विक्रेत्याने दुसऱ्या बॅग विक्रेत्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना क्रॉफर्ड मार्केटमध्ये घडली. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग  हॅरी ऊर्फ हरिसेन ॲन्थोनी जोसेफ याच्यासह त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

मुसाफिरखाना परिसरात राहण्यास असलेल्या राजू ऊर्फ अब्दुल्ला शेख (५०) यांचा क्रॉफर्ड मार्केटमधील बाबूराव शेट्टे चौक येथे बॅग विक्रीचा व्यवसाय आहे. ७ मार्चच्या दुपारी तीनच्या सुमारास अब्दुल्ला त्यांच्याकडे ओळखीच्या असलेल्या व बॅग विक्रीचे काम करणाऱ्या जोसेफ याने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, अब्दुल्ला यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. जोसेफने अब्दुल्ला यांना शिवीगाळ केली. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. जोसेफ याने त्यांना बघून घेण्याची धमकी देऊन फोन कॉल कट केला. रात्री आठच्या सुमारास अब्दुल्ला हे बॅग विक्री बंद करून मुसाफिरखाना येथील साबुसिद्दीकी रोडवरील राहत्या ठिकाणी आले. रात्री ११ च्या सुमारास ते झोपले असताना जोसेफ त्याच्या साथीदारांसोबत तेथे आला आणि त्याने अब्दुल्लाच्या दिशेने गोळ्या झाडून पळ काढला.

गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. गोळ्या लागून अब्दुल्ला हे गंभीर जखमी झाले. त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस