Join us

‘वडील आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणाऱ्याने दुसऱ्यांना शहाणपण शिकवायचे नसते’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 4:14 PM

Ashish Shelar Criticize Aditya Thackeray: बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणाऱ्याने दुसऱ्यांना शहाणपण शिकवायचे नसते, असा टोला शेलार यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

राज्य सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. या टीकेला आता भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणाऱ्याने दुसऱ्यांना शहाणपण शिकवायचे नसते, असा टोला शेलार यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री आणि इतर मंत्री जनतेच्या पैशांवर परदेश दौरे करत आहेत. पण तिथे जाऊन ते काय करणार आहेत. हे दौरे म्हणजे सुट्ट्या समजायला लागले आहेत का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला होता. तसेच तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जा पण जनतेच्या पैशांच्या अपव्यय करू नका, असा सल्ला दिला होता. त्याला आता आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आशिष शेलार म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला, कारण, मुळातच त्यांना निमंत्रण हे शासकीय अतिथी म्हणून जपान सरकारने दिले होते. अतिथी म्हणून निमंत्रण येते, तेव्हा त्यांचा खर्च हा जपान सरकार करीत असते. महाराष्ट्र सरकारने केवळ सोबत जाणार्‍या अधिकाऱ्यांचा खर्च केलेला आहे. जपान दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केले आणि किती गुंतवणूक आली, याची संपूर्ण टाईमलाईन त्यांच्या समाजमाध्यमावर उपलब्ध आहे. मोठी गुंतवणूक त्यांच्या या दौऱ्यांमुळे आली आहे. वाचली नसेल तर पुन्हा एकदा वाचून घ्यावी.

बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्‍याने दुसर्‍यांना शहाणपण शिकवायचे नसते. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका, असा टोलाही आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. 

टॅग्स :आशीष शेलारआदित्य ठाकरेमहाराष्ट्र सरकार