मुंबई : निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवते. तेव्हा ती प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी गुरुस्थानी आहे. नम्र राहील तो जग जिंकेल, देवाचे आणि गुरूचे स्मरण ३६५ दिवस असावे, असे श्री सद्गुरू वामनराव पै यांचे गुरुपौणिमेवरील मौलिक विचार अमृतबोल सदरात ऐकायला मिळाले.
जीवनविद्या मिशनने कोरोनाच्या संकटामुळे यंदाही ऑनलाइन गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि जगभरातून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १७ ते २३ जुलैदरम्यान रंगलेल्या या महोत्सवात भक्तिरंगाच्या अनेक छटांत न्हाऊन निघण्याचा आनंद हा सोहळा अनुभवणाऱ्या प्रत्येकाला घेता आला.
मंत्रमुग्ध करणारा उपासना यज्ञ, सद्गुरुपूजनाचा आनंद देऊन पावन करणारी मानसपूजा, अमृतबोल मालिकेत गुरूचे माहात्म्य आणि महत्त्व सांगणारे सद्गुरू श्री वामनराव पै यांचे प्रवचन आणि हे सद्गुरू वेगळे या विषयावर जीवनविद्येचे आजीव विश्वस्त प्रल्हाददादा पै यांचे प्रबोधन अशा कार्यक्रमांनी दिवसभरातील तिन्ही सत्रांना उत्सवाचे स्वरूप दिले होते.
शिक्षणासोबत संस्कार, अध्यात्मासोबत प्रपंच आणि पैशासोबत पुण्यही महत्त्वाचे असे क्रांतिकारी सिद्धांत मांडत निरपेक्ष कार्यकर्त्यांची फौज निर्माण करणारे, ज्ञानाला महत्त्व देणारे सद्गुरू वामनराव पै गुरू म्हणून कसे वेगळे आहेत, हे प्रल्हाद पै यांनी या प्रवचनातून मांडले.
जीवनविद्या मिशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या अवयवदान अभियान, विद्यार्थी मार्गदर्शन अभियान, ग्रामसमृद्धी अभियान, प्लास्टिकमुक्त गाव अभियान, स्वछता मोहीम, घनकचरा व्यवस्थापन मोहीम, जलशुद्धीकरण प्रकल्प, अशा विविध उपक्रमांची महिती देणारी आणि कर्जत येथील जीवनविद्या वैश्विक ज्ञानपीठाची महती सांगणारी चित्रफीत जीवनविद्येच्या कामाचा व्याप किती मोठा आहे आणि समाजोपयोगी आहे, हे दाखवून गेली. २३ जुलै रोजी या साप्ताहिक गुरुपौर्णिमा सोहळ्याची सांगता झाली असली तरी २४ ते ३१ जुलैदरम्यान जीवनविद्या मिशनच्या जगभरातील शाखा ऑनलाइन स्वरूपात आपापल्या शाखेच्या माध्यमातून पुन्हा हा गुरुपौर्णिमा सोहळा साजरा करणार आहेत.