लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधान परिषदेची आमदारकी मिळाली नाही तरी शिवसेनेचे काम करतच राहणार आहे. कोणत्याही पदासाठी मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. ज्याप्रमाणे बाॅलीवूडमध्ये लोकांनी मला स्टार बनवले त्याचप्रमाणे राजकारणात लाेकांसाठी नेता बनायचे आहे. एसी रूममध्ये बसून टि्वट करणारी नेता बनायची माझी इच्छा नाही, अशा शब्दात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आगामी काळात लोकांमध्ये राहून राजकारण करणार असल्याचे स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारने शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांची राज्यपाल नियुक्त सदस्यत्वाची शिफारस केली आहे. यावर अद्याप राजभवनातून निर्णय आलेला नाही. दरम्यानच्या काळात उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश केला होता. आपल्या आगामी वाटचालीसंदर्भात वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत टि्वटर नेता बनायचे नसल्याचे उर्मिला यांनी सांगितले. कोणत्या पदासाठी शिवसेनेत आलेली नाही. काँग्रेसमध्ये होते तेव्हाही लोकसभा उमेदवारीची अपेक्षा केली नव्हती. काँग्रेससाठी प्रचार करूनही मी समाधानी राहिले असते.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे केलेल्या टीकेसंदर्भात मातोंडकर म्हणाल्या की, पक्ष सोडतानाही मी काँग्रेसवर टीका केली नव्हती. त्यामुळे आता काही बोलण्याचा तर प्रश्नच उद्वभवत नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. पराभवामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. माझ्यासाठी माझ्या अंतरात्म्याचा आवाज महत्त्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाचेही त्यांनी कौतुक केले.
...................