‘तो’ रुग्ण परीक्षेला मुकणार?
By admin | Published: February 23, 2016 02:41 AM2016-02-23T02:41:58+5:302016-02-23T02:41:58+5:30
सेरेब्रल पाल्सी या आजाराचा रुग्ण असलेला समीर शेख (नाव बदललेले आहे) या विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेला मुकावे लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. लेखनिक नेमणुकीसंदर्भात
- प्रवीण दाभोळकर, मुंबई
सेरेब्रल पाल्सी या आजाराचा रुग्ण असलेला समीर शेख (नाव बदललेले आहे) या विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेला मुकावे लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. लेखनिक नेमणुकीसंदर्भात लेखी परवानगी न मिळाल्याने परीक्षा केंद्रावर त्याची अडवणूक होत आहे. बोर्डाकडे अर्ज करूनही नव्या-जुन्या नियमांच्या गोंधळामुळे अद्याप कोणतेही लेखी निवेदन न मिळाल्याने त्याला परीक्षा देता येणार नसल्याने पालक त्रस्त झाले आहेत.
समीरला बारावीच्या परीक्षेसाठी चर्नी रोड येथील कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्र आले आहे. लेखनिकासाठी काही महिन्यांपूर्वीच अर्ज करण्यात आला; पण बोर्डाकडून याची दखल घेतली नसल्याचे समीरच्या पालकांनी ‘लोकमत’ला सांगितले. शासननिर्णयात अशा प्रकारच्या आजारात लेखनिकाची व्यवस्था नसल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. लेखी परवानगी नसल्याने १८ फेब्रुवारीला बारावीच्या पहिल्या पेपरलाच परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. पहिल्या पेपरला त्याला बसू देण्यात आले; पण पुढच्या पेपरला येतेवेळी परवानगी नसेल तर बसता येणार नाही, असे सांगत परीक्षा केंद्रामार्फत नियमांवर बोट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे २४ फेब्रुवारी रोजी समीरची ‘सेक्रेटरिअल प्रॅक्टिस’ विषयाची परीक्षा आहे. पण अद्याप कोणतीही लेखी परवानगी नसल्याने त्याचे पालक दडपणाखाली आहेत.
सोशल मीडियाची मदत
परीक्षा सुरू झाली तरी मुलाला लेखनिकाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने परेश मेहता प्रचंड तणावाखाली होते. काहीच मार्ग निघत नसल्याने त्यांनी सोशल मीडियाची मदत घेण्याचे ठरविले. घडत असलेला सर्व प्रकार त्यांनी फेसबुक, टिष्ट्वटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
बारावीलाच अडचण का?
चालता-बोलता येत नसलेल्या धवलला दहावीचा पेपर लिहिण्यास तो शिकत असलेल्या स्पेक्टीक्ट सेंटरमधील विद्यार्थ्यांची लेखनिक म्हणून मदत झाली. मग बारावीची परीक्षा देताना अडचणी का येत आहेत, असा प्रश्न त्याचे पालक विचारत आहेत. अनेक अडचणींवर मात करत एखादा विद्यार्थी शिकत असेल तर त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी क्षुल्लक कारणे दिल्याने पालक आत्मविश्वास गमावून बसतात.
काय आहे सेरेब्रल पाल्सी? : सेरेब्रल पाल्सी असलेल्या रुग्णांना दैनंदिन हालचाल नियंत्रण करणाऱ्या मेंदूच्या एक किंवा एकापेक्षा अधिक भागाला हानी पोहोचलेली असते. त्यामुळे त्यांना दैनंदिन हालचाली करण्यास अडथळा निर्माण निर्माण होतो. मुल दोन ते तीन वर्षांचे होईपर्यंत आजाराची लक्षणे कळून येत नाहीत. तीन वर्षांहून जास्त वय असलेल्या एक हजारामध्ये दोन ते तीन मुलांना हा आजार होतो. आपल्या देशात प्रत्येक वयातील मुले व प्रौढ रुग्णांची संख्या पाच लाख इतकी आहे.
८ जानेवारी २०१६च्या शासननिर्णयात सेरेब्रल पाल्सी रुग्णांच्या लेखनिकासंदर्भात कोणताही स्पष्ट उल्लेख नव्हता; पण १५ फेब्रुवारी २०१६च्या शासन निर्णयानुसार या प्रकरणात लेखनिक नेमता येऊ शकतो.
- एस. वाय. चांदेकर, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ