जलवाहतुकीसाठी मागेल त्याला परवानगी मिळणार
By admin | Published: June 12, 2017 03:09 AM2017-06-12T03:09:30+5:302017-06-12T03:09:30+5:30
शहरातील उपनगरीय रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुकीवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डातर्फे (एमएमबी) जलवाहतुकीसाठी ‘मागेल त्याला परवानगी’ असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहरातील उपनगरीय रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुकीवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डातर्फे (एमएमबी) जलवाहतुकीसाठी ‘मागेल त्याला परवानगी’ असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. जलवाहतुकीसाठी परवानगी प्रक्रिया क्लिष्ट आहे, असा गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी जलवाहतुकीसंबंधी माहिती असलेल्या लोकांना आणि स्थानिकांना परवानगी देणार असल्याचे यासंदर्भात अधिक माहिती देताना एमएमबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगर प्रदेशातील वसई खाडी, ठाणे खाडी, बेलापूर (पनवेल) खाडी अणि तळोजा नदीसाठी जलवाहतुकीच्या निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. जलवाहतूक सेवा सुरू करणाऱ्यांना भाडे व फेऱ्या यांचे नियमन करण्याची मुभा देण्यात आली आहे.
शिवाय या चारपैकी कोणत्याही मार्गावर प्रवासी जलवाहतुकीसाठी स्वातंत्र्य देण्यात आले आहे. जलवाहतुकीसाठी आवश्यक व प्रवाशांभिमुख ‘प्रपोजल’ एमएमबीकडे देण्यात यावे. या प्रपोजलसाठी आवश्यक ती परवानगी तत्काळ देण्यात येईल. त्याचबरोबर जलवाहतूक सुरू करणाऱ्यांना अन्य काही अडचणी असल्यास पालक
या नात्याने एमएमबीच्या वतीने शक्य ती मदत करण्यात येईल. जलवाहतुकीसाठी परवानगी घ्या, शासनाचे नाममात्र कर भरा आणि जलवाहतुकीतून आर्थिक उत्पन्न कमवा, असेही पाटणे यांनी सांगितले.