मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वर्सोवाच्या प्रभाग क्रमांक ५९ च्या शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिमा खोपडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण आगामी काळात बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत राहून कोणते उपक्रम राबविणार यासंदर्भात त्यांनी सविस्तर भूमिका विषद केली.
गेले चार वर्षे मी या समितीमध्ये काम करीत असतानाचा अनुभव गाठीशी ठेवून मी माझी नवीन जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करीन. तसेच आपण स्वतः वर्सोवा येथील कोळीवाड्याच्या विभागातून निवडून आल्याने माझ्या विभागातील कोळी भगिनींच्या व बांधवांच्या प्रश्नाकडे प्रामुख्याने लक्ष देईन अशी ग्वाही पालिकेच्या नवनिर्वाचित बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्ष प्रतिमा खोपडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
आपल्या या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपण आपल्या कामाचा ठसा उमटविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या मंडया, उद्याने, मैदाने अशा तीन विभागांत विभागलेल्या कार्यक्षेत्रात काम करायचे आहे याचे भान आहे. आज भाजी व मासे विकण्यासाठी ज्या मंडया आहेत त्याची अवस्था काय आहे व तेथे विक्रीस बसणाऱ्यांच्या विशेष करून महिला वर्गाच्या काय समस्या आहेत ? याचा आढावा घेऊन त्यांच्या समस्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्याचा अग्रक्रमाने प्रयत्न करीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गेेली चार वर्षे विभागात काम करीत असताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली ती म्हणजे पाळीव प्राण्यांच्या समस्या, मुंबईतील सध्याची पाळीव प्राण्यांची संख्या लक्षात घेता प्रत्येक नगरसेवकाच्या क्षेत्रात एक ‘पेट पार्क’ विकसित केले जावे यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीन आणि या पाळीव प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याकरिता प्रत्येक महापालिका क्षेत्रात त्यांच्या दहनाची व्यवस्था असावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेने उद्याने ‘मियावाकी पद्धतीने’ विकसित करावी, तसेच प्रत्येक प्रभागात मुलांच्या मनोरंजनासाठी ‘अम्युझमेंट पार्क’ उभारावीत यासाठीदेखील प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.