शाखाप्रमुखाचा खटला फास्ट ट्रॅकवरच
By admin | Published: March 16, 2016 08:36 AM2016-03-16T08:36:59+5:302016-03-16T08:36:59+5:30
ठाणे शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस हवालदाराचा विनयभंग करणाऱ्या शिवसेना शाखाप्रमुख कालगुडेविरोधातील खटला फास्ट टॅ्रकवर चालविण्याचे जवळपास निश्चित
ठाणे : ठाणे शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस हवालदाराचा विनयभंग करणाऱ्या शिवसेना शाखाप्रमुख कालगुडेविरोधातील खटला फास्ट टॅ्रकवर चालविण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील देण्याबाबत प्रश्नचिन्ह असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
धर्मवीरनगर येथे राहणाऱ्या कालगुडे याने २५ फेब्रुवारी रोजी वागळे इस्टेट उपशाखेच्या महिला पोलीस हवालदाराला मारहाण करून तिचा विनयभंग केला. याबाबत सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झाल्यावर महिला आयोगाने याची दखल घेऊन हे प्रकरण फास्ट टॅ्रकवर चालविण्याची मागणी करत विशेष सरकारी वकील नेमणुकीबाबत सूचना केली होती. मात्र, विशेष सरकारी वकिलाबाबत अद्यापही अनभिज्ञता असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
या प्रकरणाचा तपास नौपाडा पोलिसांकडून वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानुसार, या प्रकरणाचा तपास १३-१४ दिवसांत पूर्ण करून आरोपपत्रही ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले आहे. या १२५ पानी आरोपपत्रात सीसीटीव्ही फूटेजसह त्या महिला पोलीस हवालदाराची केलेली वैद्यकीय चाचणी, मानसोपचार तज्ज्ञांकडून केलेल्या चाचणीचा अहवालाचा समावेश आहे. तर, कालगुडेवर अशा प्रकारे पाच-सहा गुन्हे दाखल असल्याने त्यास तडीपार करण्याची कारवाईही सुरू आहे.