वसई : शहरामध्ये अस्वच्छता पसरवणा-यांवर कारवाई करण्याकरीता महानगरपालिका प्रशासनाने ठेका दिला आहे. या ठेकेदाराचे कर्मचारी म्हणजेच मार्शल हे सर्वसामान्य करदात्यांना डोकेदुखी ठरले आहेत. यांच्या अरेरावीमुळे करदात्यांची अवस्था भीक नको पण कुत्र आवर अशी झाली आहे. हे मार्शल आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी निष्पाप नागरीकांना वेठीस धरु लागले आहेत. त्यामुळे करदाते विरूद्ध मार्शल असे सामने जागोजागी पहायला मिळतात. वास्तविक महानगरपालिका क्षेत्रात कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी कोट्यावधी रू. चे ठेके देवूनही स्वच्छता होत नसते हा अनुभव गाठीशी असतानाही महानगरपालिका प्रशासनाने कोणाचेतरी हित साधण्यासाठी हे मार्शलचे भूत सर्वसामान्य करदात्यांवर लादले आहे.हे मार्शल मोक्याच्या ठिकाणी उभे राहून नागरीकांना हटकतात. तुम्ही आता येथे थुंकला आहात दंड भरा असे दरडावून सांगत नागरीकांकडून जबरदस्तीने वसूली करीत आहेत. या कामास २ महिन्याचा कालावधी झाला असून महानगरपालिका क्षेत्रात किती स्वच्छता झाली याचा आढावा प्रशासनाने घ्यावा अशी करदात्यांची मागणी आहे. महानगरपालिका कार्यालयातील शौचालय प्रथम स्वच्छ करा नंतर नागरीकांना स्वच्छतेचे धडे द्या असा सूर करदात्यांमधून आळवला जात आहे. कचरा वाहून नेणाऱ्या कचरा गाडीतूनही अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा पडत असतो. वास्तविक हे प्रकार रोखण्यासाठी मार्शलला कामाला लावणे गरजेचे आहे. परंतु हे मार्शल सर्वसामान्य नागरीकांना अक्षरश पिडत असतात. महापौर व आयुक्तांनी या कामाचा आढावा घ्यावा अन्यथ: रस्त्या रस्त्यावर मार्शल विरूद्ध करदाते असा सामना पहावयास मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
महानगरपालिकेचे मार्शल झाले करदात्यांची डोकेदुखी
By admin | Published: February 27, 2015 10:53 PM