चोऱ्या वाढल्या... जागेवर उभ्या असलेल्या एसटी बस गाड्या डोकेदुखी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 09:52 AM2022-01-26T09:52:36+5:302022-01-26T09:53:45+5:30
गर्दुल्ल्यांकडून होतेय पार्ट्सची चोरी
मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा मागील अनेक दिवसांपासून संप सुरू आहे. अनेक आगारांमध्ये बसेस जागच्या जागी उभ्या आहेत. गेले अनेक दिवस या बसेस धूळ खात आगारांमध्ये उभ्या असल्याने आता या बसेस पुन्हा रस्त्यावर काढाव्या लागल्या तरी मोठा खर्च येणार आहे. या बंद बसेस एसटी महामंडळासाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. या बसेस न चालल्यामुळे बसच्या मेंटेनन्समध्ये वाढ होत चालली आहे. आगारांमधून बसचे पार्टस् चोरी जाणे व इतर नासधूस असे प्रकारदेखील घडू लागले आहेत.
चोऱ्या वाढल्या
एसटी आगार बंद असल्याचा व आगारांमध्ये गर्दी नसल्याचा फायदा घेत, चोरटे व गर्दुल्ले एसटी आगारांमध्ये उभ्या असणाऱ्या एसटी बसचे काही लोखंडी पार्टस् चोरून नेत आहेत.
मेंटेनन्स वाढला
तीन महिन्यांपासून एसटी आगारांमध्ये बस एका जागीच उभी असल्याने बसच्या बॅटरी डाऊन झाल्या. तर काही बसच्या चाकांमधील हवा कमी झाली. अनेक प्रकारची कामे बसमध्ये करावी लागणार असल्याने बस पुन्हा रस्त्यावर धावण्यासाठी महामंडळाला मेन्टेनन्स खर्च करावा लागेल.
अशा एकूण ६० बसेस रस्त्यावर धावत आहेत. दिवसाला १३६ फेऱ्या होत असून, त्यातून सुमारे तीन हजार प्रवासी प्रवास करीत आहेत.