मुख्याध्यापकांची झाली प्रशिक्षणामधून सुटका; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 12:15 PM2023-09-08T12:15:48+5:302023-09-08T12:15:57+5:30
शालेय विभागाने हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापकांना लागू करण्यात आला.
मुंबई : राज्यात ३१ जुलै २०२२ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ आणि निवड श्रेणीस पात्र शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, अध्यापक महाविद्यालयातील शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी प्रशिक्षण लागू आहे. त्यात १० दिवस किंवा ५० घड्याळी तासांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत २०२१ मध्ये निर्णय घेण्यात आला. त्यावेळी प्रशिक्षण सुरू करण्याचा अंदाजित कालावधी लक्षात घेऊन ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्यात आली होती. शालेय विभागाने हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापकांना लागू करण्यात आला.
...म्हणून सवलत देण्याची मुदत वाढविली
शासनस्तरावरून प्रशिक्षणाचे आयोजन न झाल्याने, प्रशिक्षणाची संधी उपलब्ध न झाल्याने प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत देण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. आता ३१ जुलै २०२२ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ आणि निवडश्रेणी पात्र शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत देण्यात येत असल्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.