मुंबई : सांताक्रूझमधील एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापिकेचे ई-मेल अकाउंट हॅक करून पैसे उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलने पर्दाफाश केला. या प्रकरणी मुंबई, ठाणे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून एकूण सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या बँक खात्यातून आजवर सुमारे ५० लाखांचे बेहिशोबी व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे.पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. वंदना लुल्ला यांनी त्यांचे ई-मेल हॅक झाल्याची तक्रार गेल्या आठवड्यात सांताक्रूझ पोलिसांकडे केली होती. त्यांचा मित्रपरिवार, नातेवाईक आणि अन्य ओळखीतल्या व्यक्तींकडूनच त्यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. मुळात त्यांच्या ई-मेल अकाउंटवरून मी आर्थिक संकटात आहे़ मला पैशांची नितांत गरज आहे़ अमुक अमुक बँक खात्यात पैसे भरून मला मदत करा, असे आवाहनाचे ई-मेल त्यांच्या लिस्टमधील प्रत्येकाला गेले. ई-मेलमधील आवाहन वाचून अनेकांनी त्यांना फोन केले. दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तपास सायबर सेलकडे सोपविण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक मुकुंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. पथकाने ई-मेलमध्ये नमूद करण्यात आलेल्या बँक खात्याची शहानिशा सुरू केली, तेव्हा ते खाते साताऱ्यातील अमित शिंदे याच्या नावे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शिंदेला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून पथकाने मीरा रोडहून इसाक हुसेन अब्दुल हुसेन काझी (५३), उत्तर प्रदेशातून अरशद मेहबूब सुलेमान अन्सारी (२०), लोकेश प्रेमनारायण पटेल (४०), विनोद कुमार गौतम ऊर्फ मेस्त्री (४२) आणि मध्य प्रदेशातील इंदूरहून मुकेश जगदीश प्रसाद सोनी (२६) या सहा जणांना अटक केली.हे सर्व खातेधारक आहेत. या प्रत्येकाच्या बँक खात्यात आजवर सुमारे ५० लाखांहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याची माहिती सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. या सर्वांच्या बँक खात्यांचे संपूर्ण तपशील मागवून सायबर सेलचे अधिकारी अधिक तपास करणार आहेत. ही रक्कम डॉ. वंदना प्रकरणातली नसून, त्याआधीच्या गुन्ह्यांमधली आहे. या टोळीने मुंबईसह देशभरात अशाच प्रकारे गुन्हे केल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनुसार, हे सर्व आरोपी दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतले आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नायजेरियन तरुणांची टोळी असावी, असा संशय सायबर सेलला आहे. (प्रतिनिधी)
मुख्याध्यापिकेचा ई-मेल हॅक
By admin | Published: January 21, 2015 1:09 AM