मुंबई : राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार असून, शिक्षण विभागाकडून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रम आणि कामांतून मुख्याध्यापकांना वगळले असून, केवळ शिक्षक आणि वर्ग श्रेणी १ ते ४ मधील अधिकाऱ्यांची माहिती निवडणूक अधिकाºयांकडून मागविली जात आहे. त्यामुळे शिक्षकांवर आधीच कामाचे ओझे असताना, मुख्यध्यापक वगळून शिक्षकांवरच अन्याय कशासाठी, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
आगामी २०१९च्या विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचाºयांची आवश्यकता असल्याने, शहरातील अनुदानित, पालिका, रात्रशाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडून माहिती मागविण्यात येत आहे. शिक्षण निरीक्षकांकडून मुख्याध्यापकांना देण्यात आलेल्या पत्रात मुख्याध्यापकांचे नाव वगळून माहिती द्यावी, असे नमूद आहे. मुख्यध्यापकांपेक्षा शिक्षकांना काम जास्त असते, शिवाय ज्या शाळांत शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात आले आहेत, अशा शाळांत आधीच शिक्षकांची कमतरता आहे. त्या शाळांत शिक्षकांनी वर्गातील अभ्यासाचे व्यवस्थापन आणि निवडणुकीचे काम कसे काय सांभाळायचे, असा प्रश्न शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील सुमारे ६५ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांनी राज्य सरकारविरोधात असहकार आंदोलन पुकारले असून, आगामी विधानसभा निवडणूक कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या शिक्षकांनी घेतला आहे. शिक्षकांवर टाकण्यात येणाºया या अतिरिक्त कामाचे ओझे कमी करण्यात यावे, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
निवडणूक कामांतील शिक्षकांच्या सहभागासंदर्भात कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यभरातील विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाºया सरकारसाठी आम्ही काम का करायचे, असा सवाल महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी केला आहे. अनुदानाच्या मागणीसाठी आतापर्यंत १५२ आंदोलने करूनही सरकार मराठी व प्रादेशिक भाषेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना त्यांच्या हक्कानुसार अनुदान देऊ शकत नसेल, तर निवडणूक प्रक्रियेत आम्हाला सहभागी व्हायचे नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.ताळमेळ कसा घालणार?मुख्याध्यापकांपेक्षा शिक्षकांना प्रत्यक्षात उपक्रमाची आखणी करणे, पेपर तपासणी यासारखी अधिकची कामे असतात. अशा वेळी या कामांचे व्यवस्थापन आणि निवडणूक कामे यांचा ताळमेळ शिक्षक कसा घालणार?- राजेश पंड्या, उपाध्यक्ष, शिक्षक लोकशाही आघाडी