सुमारे ९०० कर्मचारी कार्यरत असलेल्या महावितरण आणि महानिर्मितीच्या मुख्यालयाचे २ वर्षांतून एकदा होते ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:06 AM2021-01-21T04:06:51+5:302021-01-21T04:06:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आगीच्या घटना, आपत्कालीन घटना आणि सुरक्षा डोळ्यांसमोर ठेवत वांद्रे येथील प्रकाशगडमध्ये असलेल्या महावितरण आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आगीच्या घटना, आपत्कालीन घटना आणि सुरक्षा डोळ्यांसमोर ठेवत वांद्रे येथील प्रकाशगडमध्ये असलेल्या महावितरण आणि महानिर्मितीच्या मुख्यालयाचे दोन वर्षांनी एकदा फायर/इलेक्ट्रिक ऑडिट केले जात आहे. महावितरण आणि महानिर्मितीच्या मुख्यालयात सुमारे ९०० कर्मचारी काम करत असून, येथे अग्निसुरक्षेबाबत सर्व खबरदारी घेण्यात येत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडत असतात. आगीच्या बहुतांशी घटना या वस्ती किंवा कंपनीत घडतात. यात मोठी मनुष्यहानी व वित्तहानीही होते. मुंबईसारख्या मोठ्या शहरात मुंबई अग्निशमन केंद्र आणि मुंबई महापालिका नागरिकांना फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे आवाहन करत असते. याव्यतिरिक्त वीज कंपन्या वीज ग्राहकांना ऑडिट करण्याचे आवाहन करीत असतात. मात्र ज्या वीज कंपन्यांकडून हे आवाहन केले जाते; तेथे प्रत्यक्षात काय स्थिती आहे, हे ‘लोकमत’ने जाणून घेतले.
वांद्रे येथील प्रकाशगडमध्ये महावितरण आणि महानिर्मितीचे मुख्यालय आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये मिळून सुमारे ९०० कर्मचारी काम करत आहेत. अग्निसुरक्षा असो किंवा आपत्कालीन व्यवस्थापन याचा येथे प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. येथे फायर अलार्म सिस्टीम आहे. २४ तास काम करणारा नियंत्रण कक्ष आहे. सुरक्षा रक्षक जिथे बसतात तिथेदेखील यंत्रणा कार्यान्वित आहे.
येथील मजल्यावर कोणी धूम्रपान करीत असेल तर त्याची माहिती यंत्रणेला मिळते, एवढी ही यंत्रणा सक्षम आहे. या ठिकाणी असलेली इमारत पूर्णपणे सुरक्षित आहे, असा दावा येथील प्रशासनाने केला आहे.
* ९०० कर्मचारी कार्यरत
महावितरण आणि महानिर्मितीच्या मुख्यालयात सुमारे ९०० कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी येथील यंत्रणा काम करत आहेत. दोन वर्षांतून एकदा फायर/इलेक्ट्रिकल ऑडिट केले जाते. अग्निसुरक्षा असो किंवा आपत्कालीन व्यवस्थापन याचा विचार करूनच येथे काम सुरू असते.
- अनिल कांबळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई
------------------
मुंबईच्या उपनगरात म्हणजे भांडुप येथे महावितरणचे आणखी एक कार्यालय आहे. भांडुप झोन अंतर्गत ठाणे, वाशी आणि पेण ही तीन सर्कल येतात. येथे सुमारे २०० कर्मचारी काम करीत आहेत. येथेही दोन वर्षांतून एकदा ऑडिट केले जाते.
------------------
सरकारी कंपनी असल्याने ऑडिट बंधनकारक आहे. त्यानुसार वांद्रे येथील मुख्यालय असो किंवा इतर कार्यालये येथे ऑडिट केले जाते.
- कृष्णा भोयर, वीज कामगार नेते
------------------
वांद्रे येथे महावितरणचे मुख्यालय आहे. चर्चगेट येथे एक कार्यालय आहे. भांडुप येथे एक कार्यालय आहे.
------------------
वांद्रे येथे सुमारे ९०० आणि भांडुप येथे सुमारे २०० कर्मचारी काम करीत आहेत.
------------------