- संतोष आंधळे मुंबई : शहरात कुठलाही साथीचा आजार आला की, मुंबई महानगरपालिकेच्या १२० वर्षे जुन्या कस्तुरबा रुग्णालयाची आठवण आरोग्य विभागाला होते. मुंबईची लोकसंख्या दोन कोटींवर गेली आहे. महामुंबई क्षेत्रातही मोठ्या महापालिका आहेत. एकामागून एक संसर्गजन्य आजार थैमान घालत असल्याने त्यांचा मुकाबला करण्यासाठी इतर रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. मात्र, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर आपत्ती ओढवली की साथीच्या आजाराचे नवीन रुग्णालय कधी होणार?, यावर चर्चा होण्यापलीकडे काहीच होत नाही.
संसर्गजन्य आजारांचा मुकाबला करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुलुंड येथे विशेष रुग्णालय बांधण्यात येणार होते. गोवराच्या साथीने रौद्र रूप धारण केल्यानंतर आरोग्य विभागाने अन्य महापालिकांच्या रुग्णालयांचा आधार घेतला आहे. अतिरिक्त कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव केली जात आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी, आवश्यकता भासल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाचे मनुष्यबळ घ्या, अशी सूचना महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे.
याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) डॉ. संजीव कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, गोवरच्या मुलांना आम्ही सध्या कस्तुरबाव्यतिरिक्त इतर रुग्णालयात दाखल केले आहे. स्वतंत्र पद्धतीचे साथीच्या आजाराचे नवीन रुग्णालय हवे का? या विषयाचा नक्कीच अभ्यास करू, लक्ष घालू. मात्र सध्या तरी कोणता प्रस्ताव नाही.
मुंबईसारख्या मोठ्या शहराला कस्तुरबा रुग्णालयाव्यतिरिक्त आणखी एक स्वतंत्र साथीच्या रुग्णालयाची नक्कीच गरज आहे. प्रशासनाने तत्काळ पावले उचलली पाहिजे. कारण संसर्गजन्य आजाराच्या उपचारांची व्यवस्था स्वतंत्र अशा रुग्णालयात व्हावी, जेणेकरून आजार इतर रुग्ण आणि सर्वसामान्यांमध्ये पसरणार नाही. त्याचप्रमाणे दाटीवाटीने वस्तीत राहत असलेल्या नागरिकांच्या गृहनिर्माणावरसुद्धा काम करणे गरजेचे आहे. - डॉ. सुहास पिंगळे, महाराष्ट्र अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशनरुग्णालयावरील ताण कधी कमी होणार ? ब्रिटिशांनी १८९२ साली बांधलेल्या कस्तुरबा रुग्णालयात सर्वच प्रकारच्या संसर्गजन्य आजारांवर उपचार देण्यासाठी स्वतंत्र कक्ष आहेत. मात्र, हे आजार इतर सर्वसामान्य रुग्णांना होऊ नये, यासाठी विशेष करून या रुग्णालयाची निर्मिती केली होती. मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील एकमेव स्वतंत्र असे साथीच्या आजाराचे हे रुग्णालय आहे. या अशाच प्रकारचे रुग्णालय मुंबईतील उपनगरीय भागात असावे, ज्यामुळे तेथील नागरिकांना या रुग्णालयात यावे लागणार नाही. परिणामी, कस्तुरबा रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत होईल.