मुंबई : महाराष्ट्र राज्य विमा मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने आरोग्य व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त हॉटेल ताजमहल पॅलेस येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारत सरकारच्या विविध विभागांतील कर्मचारी एकत्र आले होते.
अशोक गुप्ता यांनी ईएसआयद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. या शिबिरात फिजिओ थेरेपी, न्युट्रिशन, स्त्रीरोग व दंतविषयक समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शरीरातील साखरेचे प्रमाण, उच्च रक्तदाब, बॉडी मास इंडेक्स, ऑक्सिजन सॅच्युरेशन या सर्वांचे मूल्यमापन करण्यात आले. या व्यतिरिक्त महत्त्वाच्या शारीरिक समस्यांची तपासणी व निदान करण्यात आले. यावेळी विमाधारक कामगारांनी आरोग्याविषयी विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे देण्यात आली.
विमाधारक महिलांना प्रसूती रजा व लाभांविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ताज महल पॅलेसमधील १०० हून अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. महाराष्ट्राचे एसी आणि आरडी प्रणव सिन्हा यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य प्रादेशिक कार्यालय पी.आर. सेलचे उपसंचालक अलोक गुप्ता आणि ताजमहल पॅलेसचे डीजीएम हेमंत जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त राज्य वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप नगराळे व इतर सहकारी उपस्थित होते. यावेळी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.